वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते मुंबईत ‘गार्टेक्स टेक्सप्रोसेस इंडिया’चे उद्घाटन
वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी कापड निर्मिती यंत्रावरील भारताचे आयात अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवर दिला भर
कापड निर्मिती यंत्रामधील नवोन्मेष अनेकांसाठी विशेषत: या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी मूल्य वृद्धी करू शकते: वस्त्रोद्योग राज्यमंत्री
Posted On:
12 MAY 2022 8:15PM by PIB Mumbai
मुंबई, 12 मे 2022
केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज मुंबईत ‘गारटेक्स टेक्सप्रोसेस इंडिया’चे उद्घाटन केले आणि भारतातील आघाडीच्या कापड आणि वस्त्र निर्मिती व्यापार मेळाव्याचा प्रारंभ केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी देशात वस्त्रोद्योगाने दिलेले योगदान आणि बजावलेली भूमिका यांचा उल्लेख केला. "उत्पादनात वस्त्रोद्योग क्षेत्राचा वाटा 10%, भारताच्या जीडीपीमध्ये 2% आणि देशाच्या निर्यात उत्पन्नात 15% वाटा आहे," असे त्या म्हणाल्या.
मॅन मेड फॅब्रिक (एमएमएफ) आणि तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी 10,683 कोटी रुपये खर्चासह उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीचा सकारात्मक परिणाम झाल्याचे त्या म्हणाल्या. "67 कंपन्या पुढे आल्या, त्यापैकी 61 कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
जरदोश यांनी भारतीय वस्त्रोद्योगाच्या गरजांबाबत बोलताना सुती कापडावर अवलंबून असलेल्या भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले जेथे मानवनिर्मित फायबरचा वाटा (MMF) 75% आहे. डेनिम फॅब्रिकमध्ये उद्योगाने दाखवलेल्या स्वारस्याची त्यांनी प्रशंसा केली आणि तरुण पिढी याकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कापड निर्मिती यंत्रे विकसित करणे ही काळाची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. कापड निर्मितीतील यंत्रामधील नवोन्मेष अनेकांसाठी विशेषत: या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी मूल्य वृद्धी करू शकते असे त्यांनी सांगितले. भविष्यात तयार कपड्यांच्या विशेषत: डेनिम कापडापासून बनवलेल्या कपड्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महिलांना योग्य कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उद्योग क्षेत्र आणि संशोधकांनी त्यांच्या अभिनव संशोधनांसह पुढे यावे आणि समस्येवर उपाय शोधू शकणाऱ्या संशोधनाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री जरदोश यांनी यावेळी केले.
दिल्ली ते मुंबई असा विस्तार असणाऱ्या आणि कपडे ते फॅशन अशी संपूर्ण श्रेणी एका मंचावर आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाची निर्मिती केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी या प्रदर्शनाच्या आयोजकांची प्रशंसा केली. “हे प्रदर्शन देशातील वस्त्रोद्योग समूहाला मागणी येईल याची सुनिश्चिती करते. या प्रदर्शनामुळे देशांतर्गत उत्पादकांना योग्य तंत्रज्ञान ओळखण्याची संधी मिळेल आणि त्यातून भारतीय वस्त्रोद्योगाच्या विकासाला मदत होईल,” असे त्या म्हणाल्या.
या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात - फॅब्रिक्स अँड ट्रिम्स, डेनिम शो आणि स्कीन प्रिंटींग इंडिया-अशा विशेष प्रकारे निर्मित घटकांच्या अंतर्गत अत्याधुनिक वस्त्रे-प्रावरणे सादर करणारे 100 हून अधिक ब्रँड्स सहभागी झाले होते. 25 हून अधिक भारतीय डेनिम कारखान्यांनी देखील त्यांची उत्पादने या प्रदर्शनात मांडली होती. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी यावेळी व्यापार जत्रेमध्ये देखील फेरी मारून उत्पादनांची माहिती घेतली.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर या उद्योगातील विविध प्रमुख तज्ञांशी सीएक्सओ गटाची चर्चा झाली.
वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांच्या आयातीवर असलेले भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि उपाययोजनांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला पुन्हा एकत्र आणणे हा या प्रदर्शनाच्या मंचाचा उद्देश आहे.
S.Patil/S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824878)
Visitor Counter : 186