रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेसाठी सिद्ध झालेले तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि प्रभावी विपणन आवश्यक असल्यावर नितीन गडकरी यांनी दिला भर
Posted On:
09 MAY 2022 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2022
प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेसाठी सिद्ध झालेले तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि प्रभावी विपणन या सर्व गोष्टी आवश्यक आहेत, यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. CSIR-CRRI यांनी खड्डे दुरुस्तीसाठी तयार केलेल्या फिरत्या कोल्ड मिक्सर कम पेव्हर मशीन आणि पॅच फिल मशीनचे अनावरण करताना ते बोलत होते. रस्ते निर्मिती क्षेत्रात, बांधकामाचा खर्च कमी करणे आणि बांधकामाचा दर्जा सुधारणे, यासर्वात महत्त्वाच्या बाबी असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. कोणतेही तंत्रज्ञान पेटंट नोंदणीपुरते मर्यादित नसते. जोपर्यंत पेटंटचे व्यावसायिकीकरण होत नाही आणि त्याचा पूर्ण वापर होत नाही तोपर्यंत नियमित पाठपुरावा करून तो अंतिम टप्प्यात नेणे ही संस्थेची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
सिद्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात व्यवस्था साशंकता दाखवत असण्यामागे विविध कारणे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नवीन प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या कार्यान्वयनासाठी संवाद, समन्वय आणि सहकार्यामध्ये ताळमेळ आवश्यक आहे, असे ते म्हणाले. नागपूर येथे 1997 मध्ये सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी CSIR ने आरेखित केलेल्या रस्त्यावर अजूनही एकही खड्डा आढळलेला नाही असे सांगून गडकरी यांनी कौतुक केले. रस्ते बांधणीत पोलाद आणि सिमेंटच्या पर्यायी वापरासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वाढते उपयोजन भारताच्या विकासाच्या प्रवासात मोलाची भर घालत आहे. या क्षेत्रात स्वस्त, टिकाऊ आणि पुनर्वापर करण्यायोग्य तंत्रज्ञानाचा वापर भारतात उच्च दर्जाच्या रस्त्यांचे जाळे वेगाने तयार करत आहे, असे त्यांनी सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून येत्या काही दशकांत भारताची प्रगती निश्चित होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
बिटुमेन इमल्शन(रंग द्रावणाचा प्रकार) वापरून वरचा काळा स्तर बांधण्यासाठी फिरत्या कोल्ड मिक्सर कम पेव्हर' आणि खड्डे दुरुस्तीसाठी 'पॅच फिल मशीन' या दोन उपकरणांच्या राष्ट्रार्पणाचा संदर्भ देताना डॉ. सिंग म्हणाले, ही आत्मनिर्भर भारताची परिपूर्ण उदाहरणे आहेत. उपकरणे पूर्णपणे स्वदेशी आहेत. कोल्ड मिक्सर आणि पॅच फिल मशीन भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये, विशेषतः ईशान्येकडील प्रदेशात रस्ते आणि महामार्ग तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823952)
Visitor Counter : 197