वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकार येत्या काही वर्षांत अधिक सहभागासह देशातील मोठ्या लोकसंख्येच्या माध्यमातून गुंतवणूक- प्रेरित, निर्यात-प्रणित विकास साध्य करण्यावर काम करत आहे: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 06 MAY 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग क्षेत्रातील सदस्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. उद्योग क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे निर्माण होऊ शकलेल्या ‘देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारतात असणाऱ्या अमर्याद शक्यता आणि असंख्य संधीं’बद्दल ते बोलत होते. ‘आयएमसी अर्थात भारतीय मर्चंट्स चेंबर यांच्यातर्फे आयोजित – संधींचा शोध- भारतात गुंतवणूक का करावी’ या विषयावर आज नवी दिल्ली येथे आयोजित उद्घाटनपर सत्राला आभासी पद्धतीने संबोधित करताना त्यांनी हे विचार  व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, “आपले सरकार येत्या काही वर्षांत अधिक सहभागासह देशातील  मोठ्या लोकसंख्येच्या माध्यमातून गुंतवणूक- प्रेरित, निर्यात-प्रणित  विकास साधण्यावर   काम करत आहे. सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात केली,  व्यवसाय सुलभता वाढवली,  थेट परदेशी गुंतवणूकविषयक धोरणात सुधारणा केल्या , अनुपालन भार कमी केला,  पंतप्रधान गतिशक्ती, मेक इन इंडिया इत्यादी उपक्रम हाती घेतले आहेत.

ते म्हणाले, “ सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतात  स्थैर्य आहे. मजबूत संरचनात्मक सुधारणा, मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य, अंदाज येण्याजोगी धोरणे आणि व्यवसायस्नेही सुधारणा यांनी भारताला जगातील सर्वात जास्त खुल्या, गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्थेच्या रुपात प्रस्थापित केले आहे.”

काही दिवसांपूर्वीच भारताने युनिकॉर्नच्या संख्येचे शतक पार केले याचा उल्लेख करत केंद्रीय मंत्र्यांनी या अभूतपूर्व यशासाठी भारतातील सर्व स्टार्ट अप उद्योजकांचे अभिनंदन केले.

गेल्या 6 वर्षांत भारताने विक्रमी प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक झालेली पाहिली, विशेषतः 2020-21 मध्ये भारतामध्ये 82 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आतापर्यंतचा सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ आला असे देखील गोयल यावेळी म्हणाले.  

ही परिषद भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, उत्पादक तसेच सेवा पुरवठादार यांच्यासोबत एकत्र काम करण्यासाठी, भारतात गुंतवणूक करण्यासाठी तसेच उत्पादन करण्यासाठी आणि भारतातर्फे जगाला सेवा पुरविण्यासाठी त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यात मदत करेल अशी आशा केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली.


* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823367) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu