उपराष्ट्रपती कार्यालय

करप्रणाली आणखी सुलभ करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


स्थायी, वापरकर्तास्नेही आणि पारदर्शक करव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींचा भर

करदाते आणि कर प्रशासक यांच्यातील संवादामध्ये विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर आदराची भावना व्यक्त व्हावी : उपराष्ट्रपती

आयआरएस (प्राप्तीकर)च्या 74 व्या तुकडीच्या समारोप समारंभामध्ये नागपूर येथे उपराष्ट्रपतींनी केले मार्गदर्शन

Posted On: 29 APR 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज ऐच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन मिळावे आणि खटल्यांची संख्या कमी व्हावी, यासाठी करप्रणाली अधिक सुलभ करण्याचे आवाहन केले. जटिल आणि कंटाळवाणी प्रक्रिया संपुष्टात आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. तसेच स्थायी, वापरकर्त्याला अनुकूल आणि पारदर्शक करव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर येथे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी)मध्ये भारतीय महसूल सेवेच्या (प्राप्तीकर) 74 व्या तुकडीच्या समारोप कार्यक्रमामध्ये आज मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपतींनी निरीक्षण नोंदवताना म्हटले की, आपल्याकडे करदात्यांना अनुकूल आणि पारदर्शक प्रशासकीय सेवा देताना तंत्रज्ञानाची खूप मोठी मदत मिळू शकते. राष्ट्राच्या उभारणीमध्ये भारतीय महसूल सेवेची आणि कर संकलन माध्यमाची महत्वपूर्ण भूमिका असते, असे नमूद करून व्यंकय्या नायडू यांनी कर कायदे आणि कार्यपद्धती तसेच इतर क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी अनुपालन सर्वसामान्यांना प्रमाण होईल आणि नागरिक वेळेवर, स्वेच्छेने आणि सहजपणे कर भरतील, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

प्रभावी कर प्रशासन हा राष्ट्रीय विकासाचा पाया आणि सुशासनाचा आधारस्तंभ असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी कर संकलन वाढविणे आवश्यक आहे, मात्र ते मनमानी पद्धतीने केले जावू नये. कर संकलन पारदर्शक आणि वापरकर्तास्नेही पद्धतीने केले पाहिजे, असे अधोरेखित केले. अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक कर सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्याबद्दल उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. तसेच पुनरावृत्तीविषयी होणारी अपिले टाळण्यासाठी खटल्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे, फेसलेस शासन आणि इतर दूरगामी धोरणात्मक उपायांसाठी सीबीडीटीचे कौतुक केले.

सरकारच्या दृष्टीने कर म्हणजे केवळ कमाईचा स्त्रोत आहे असे नाही तर सामाजिक-आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रभावी साधन असल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले. तरूण अधिका-यांनी आपले कर्तव्य पार पाडताना येणारी आव्हाने आणि अडचणी यांनी खचून जावू नये , असे आवाहन करून अशा वेळी त्यांनी सल्लामसलत करून आव्हानांवर उपाय शोधावा असे नायडू यांनी सांगितले. जगभरातल्या सर्वोत्तम पद्धती जाणून घेवून, शिकून पारंगत व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.

उपराष्ट्रपतींनी कर प्रशासनाच्या समकालीन आणि भविष्यकालीन गरजांचा विचार करून अधिका-यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल एनएडीटीच्या अधिकारी आणि प्राध्यापकवर्गाचे कौतुक केले. तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यावर्षी सर्वाधिक प्राप्तीकर संकलन सुनिश्चित करण्यात यश मिळवले, याबद्दल नायडू यांनी याप्रसंगी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर फेसलेस असेसमेंट योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही अभिनंदन केले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सीबीडीटीचे अध्यक्ष जे.बी. मोहापात्रा, डी.जी. एनएडीटी, आयआरएसच्या 74 व्या तुकडीतील अधिकारी आदि यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण


* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821394) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil