सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात उद्यमशीलतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या ‘एन्टरप्राइज इंडिया’ या महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 27 APR 2022 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते,  ‘एन्टरप्राइज इंडिया’ या महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात,  27 एप्रिल ते 27 मे 2022 या महिनाभराच्या कालावधीत, देशात उद्यमशीलता वाढवणाऱ्या संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांची मालिका असणार आहे. तसेच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी यात जनजागृतीही केली जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमांचा उद्देश, ‘लोकसहभाग’ वाढवणे हा आहे. त्यासाठी, काही महत्वाचे उपक्रम म्हणजे, क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उद्यमशीलता जनजागृती कार्यक्रम राबवणे, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये पथनाट्ये सादर करणे, ‘उद्यम’पोर्टलवर नोंदणीसाठी विशेष अभियान, एमएसएमई च्या शाश्वत झेड प्रमाणपत्र योजनेची सुरुवात, विविध राज्यांत एमएसएमई  मोहीम राबवणे, एमएसएमई विषयक मोठ्या प्रदर्शनांचे आयोजन करणे, इत्यादींचा समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यान, उद्योगक्षेत्रातील संघटनांची केंद्रीय मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी, या उपक्रमातून एमएसएमई क्षेत्रातील सध्याच्या योजना, धोरणे आणि कार्यक्रम यांच्याबाबत भविष्यातील अंमलबजावणीविषयी काहीतरी ठोस उपाय हाती लागतील तसेच, काही नव्या उपक्रमांची आखणी करता येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी  एमएसएमई क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचे राणे यांनी यावेळी अधोरेखित केले.

तसेच, या क्षेत्रांत आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आणि एकूणच विविध क्षेत्रांना असलेल्या समस्यांविषयीही यावेळी चर्चा झाली. एमएसएमई देशाच्या विकास दराला चालना देणाऱ्या क्षेत्रापैकी एक असून, जीडीपी मधील एमएसएमईचे योगदान  लक्षणीय असते, ते आणखी वाढवण्याची गरज आहे,  असा पुनरुच्चार त्यांनी केला. एमएसएमईच्या विकासातून देश आत्मनिर्भर बनवणे शक्य आहे, असेही ते म्हणाले . या चर्चेतून एमएसएमई क्षेत्राला अधिक गतिमान बनवण्या विषयी अनेक ठोस उपाययोजना समोर आल्या.

एमएसएमई क्षेत्राचे राज्यमंत्री भानू प्रताप सिंह मेहता, देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याशिवाय,  केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश, उद्योग क्षेत्र आणि विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय आणि एकतानता निर्माण करणे हा आहे.


* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820740) Visitor Counter : 253