नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या "उडान" योजनेची सार्वजनिक प्रशासनातील गुणवत्तापूर्ण कामगिरीकरता पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड


दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि हवाई संपर्क व्यवस्था  वाढवणे हे उडानचे उद्दिष्ट

Posted On: 16 APR 2022 6:17PM by PIB Mumbai

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची (एमओसीए) पथदर्शी प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना उडानची (UdeDeshkaAamNagrik) नवोन्मेष (सामान्य) केंद्रीय श्रेणी अंतर्गत सार्वजनिक प्रशासनातील गुणवत्तापूर्ण कामगिरीकरता 2020 च्या पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हे आणि राज्य/सरकारच्या संस्थांनी केलेल्या असामान्य आणि नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेण्यासाठी, मान्यता देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी केन्द्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे.  ही योजना केवळ परिमाणात्मक उद्दिष्टे साध्य करण्याऐवजी सुशासन, गुणात्मक उपलब्धी आणि शेवटच्या टप्प्यातील संपर्क व्यवस्थेवर भर देते.  चषक, मानपत्र आणि प्रोत्साहनपर 10 लाख रुपये यांचा पुरस्कारात समावेश आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिनी हा पुरस्कार दिला जाणार आहे. केन्द्र सरकारतर्फे विज्ञान भवन येथे "नागरी सेवा दिनानिमित्त" एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तिथे मंत्रालयाच्या प्रतिनिधीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

उडान योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. विमान प्रवास करण्याची सामान्य माणसाची आकांक्षा पूर्ण करणे हा योजनेचा उद्देश आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि हवाई संपर्क व्यवस्था  वाढवणे यांचाही उद्दीष्टांमधे समावेश आहे. 5 वर्षांच्या अल्प कालावधीत, आज 415, उडान मार्गांनी हेलीपोर्ट आणि जल विमानतळांसह 66 कार्यान्वीत नसलेल्या किंवा कमी प्रमाणात कार्यान्वीत असलेल्या विमानतळांना जोडले आहे.  92 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ झाला आहे.  या योजनेअंतर्गत 1 लाख 79 हजारांहून अधिक उड्डाणे झाली आहेत.  उडान योजनेचा संपूर्ण भारतातील अनेक क्षेत्रांना प्रचंड फायदा झाला आहे. यात पहाडी राज्ये, ईशान्य प्रदेश आणि बेटे यांचा समावेश आहे.

उडानचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडला असून उद्योगातील भागधारक विशेषतः विमान कंपन्या आणि राज्य सरकार यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  योजनेंतर्गत आता 350 हून अधिक नवीन शहरांच्या जोड्या जोडल्या जाणार आहेत, ज्यात 200 आधीच जोडल्या गेल्या आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या व्यापकपणे पसरलेल्या आहेत. देशाला संपर्क व्यवस्था प्रदान केली जात आहे, तसेच संतुलित प्रादेशिक वाढ सुनिश्चित केल्यामुळे आर्थिक वाढ आणि स्थानिकांना रोजगारही मिळत आहे.

या योजनेमुळे सिक्कीममधील गंगटोकजवळील पाकयोंग, अरुणाचल प्रदेशातील तेजू आणि आंध्र प्रदेशातील कुर्नूल सारख्या नवीन ग्रीन फील्ड विमानतळांचाही विकास झाला. तसेच महानगरीय नसलेल्या विमानतळांच्या देशांतर्गत प्रवासी हिश्शामधे 5% वाढ झाली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची 2024 पर्यंत 100 नवे विमानतळ बांधण्याची योजना आहे. तर उडान आरसीएस योजनेंतर्गत 2026 पर्यंत 1,000 नवीन मार्ग सुरु करण्याचे उद्दीष्ट आहे.

नुकतेच, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिन 2022 चा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले. प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना (आरसीएस) उडान (उडे देश का आम नागरिक) ही चित्ररथाची संकल्पना होती.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817333) Visitor Counter : 241