आयुष मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी गांधीनगर येथे ‘जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे करणार उद्घाटन

Posted On: 15 APR 2022 7:34PM by PIB Mumbai

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिल 2022 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे तीन दिवसीय जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे (GAIIS) उद्घाटन करतील.

2022 साठी आयुष मंत्रालयाचा सर्वात समर्पक कार्यक्रम असलेल्या या शिखर परिषदेत पारंपरिक औषधे आणि प्रणालींना प्रोत्साहन देण्याच्या मार्गांविषयी चर्चा करण्यासाठी प्रतिष्ठित उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांचा सहभाग असेल. शिखर परिषदेचा भाग म्हणून, 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा, 2 परिसंवाद होणार असून, 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रदर्शक उपस्थित राहणार आहेत. दूतावास, उद्योग आणि बड्या कॉर्पोरेट्समधून वक्ते आणि मुत्सद्दी उपस्थित असतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आयुष निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रमही राबवले जातील.

भारताला जागतिक आयुष स्थान म्हणून विकसित करण्यासाठी किफायतशीर गुंतवणूक आकर्षित करणे हे शिखर परिषदेचे एक उद्दिष्ट आहे. अलिकडच्या वर्षांत, थेट परदेशी गुंतवणुकीवर (FDI) निर्बंध नसल्यामुळे भारतात प्रचंड गुंतवणूक झाली आहे. आयुष मंत्रालयाला हे कायम ठेवत औषधाच्या पारंपरिक प्रणालींची ओळख आणि वाढ सक्षम करण्यासाठी लक्ष्य-केंद्रित उपक्रम सुरू करण्याकरिता या मंचाचा उपयोग करून घ्यायचा आहे.

कार्यक्रमाच्या घोषणेवर आपले मत व्यक्त करताना, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, आम्हाला जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद 2022 ची घोषणा करताना अभिमान वाटतो, जी भारताला जागतिक आयुष स्थान बनण्यास मदत करण्यासाठी नवोन्मेष आणि उद्योजकता या विषयावर विशेष तयार केलेल्या कार्यक्रमासाठी देशातील आघाडीचे स्टार्ट-अप, उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हितधारक या सर्वांना एकत्र आणेल. आयुष क्षेत्राची सध्याची बाजारातील व्याप्ती 2014-2020 पासून प्रति वर्ष 17% ने वाढली आहे आणि आम्ही या महत्वाकांक्षी कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे या क्षेत्राची यशस्विता आणखी वाढवण्याची आशा करतो.

आयुष क्षेत्राबद्दल आपले विचार मांडताना, आयुषचे राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालुभाई म्हणाले, जेव्हा आपण निरोगी आणि संतुलित असतो, तेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो आणि समाजाचा एक भाग म्हणून आपली जबाबदारी सामायिक करू शकतो. आयुष प्रणाली आरोग्य राखण्यासाठी आहाराच्या नियमांवर मोठ्या प्रमाणात विचार मांडते. याने अनेक सोप्या पद्धतींचे समर्थन केले आहे जे आम्हाला आमच्या स्वत्वाशी पुन्हा जोडण्यात मदत करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राचा भूमीपूजन समारंभ देखील 19 एप्रिल रोजी गुजरातच्या जामनगर येथे होणार आहे. हे केंद्र जगातील पारंपरिक औषध प्रणालींना नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या जागतिक आरोग्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयास येईल. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांना देखील मदत करेल जेणेकरुन सकारात्मक आरोग्याचा प्रसार जगभर करता येईल.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1817155) Visitor Counter : 172