उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी शाळा आणि पालकांना मुलांना त्यांच्या आवडीचे कला प्रकार शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले


उपराष्ट्रपतींनी संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार प्रदान केले

Posted On: 09 APR 2022 2:26PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून  शाळा आणि पालकांना मुलांना त्यांच्या आवडीचा कोणताही कला प्रकार शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. आपल्या मुळांकडे परत जाण्याच्या गरजेवर भर देत त्यांनी भारतीय समाजात सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आवाहन केले.

पाश्चात्य संस्कृतीच्या वेडामुळे कठपुतळीसारखे समृद्ध पारंपरिक लोककला प्रकार लोप पावत आहेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले. केवळ सरकारांच्याच नव्हे तर समाजाच्या सक्रिय सहभागाने या कलांचे  पुनरुज्जीवन केले पाहिजे. लहान वयातच सर्जनशीलता आणि कलेची ओळख करून दिल्यामुळे मुलांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि त्यांना अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत होईल, असे सांगत  नायडू यांनी शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात कला विषयांना समान महत्त्व द्यावे अशी अपेक्षा  व्यक्त केली.

संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी शिष्यवृत्ती  आणि 2018 चे अकादमी पुरस्कार वितरण आणि 62 व्या राष्ट्रीय कला पुरस्कारांच्या प्रदर्शन प्रसंगी उपराष्ट्रपती बोलत होते. कला प्रकार आणि उपयोजित कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी विविध कलाकारांना सन्मानित केले.

स्वातंत्र्य चळवळीदरम्यान देशभक्ती भावना जागृत करण्यात  दृक आणि प्रयोगनिष्ठ कलांच्या   भूमिकेचे स्मरण करून उपराष्ट्रपती म्हणाले की ब्रिटीश दडपशाहीच्या कथा प्रभावीपणे सांगण्यासाठी कलेचा वापर "शक्तिशाली राजकीय शस्त्र" म्हणून केला गेला.

"आपल्या समृद्ध भूतकाळाला वर्तमान आणि भविष्याशी जोडणाऱ्या सातत्यपूर्णतेचा धागा बळकट करण्यासाठी" कलाकारांच्या योगदानाचे कौतुक नायडू यांनी केले. त्यांनी नमूद केले की कला विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणते , प्रभावित करते आणि त्यांना प्रेरित करते, आणि अशा प्रकारे "प्रक्रियेतील बदलाचे एक शक्तिशाली माध्यम  बनते" . "आपली  भव्य सांस्कृतिक परंपरा आणि विविध कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा  सर्वांचे कर्तव्य आहे" असे  ते म्हणाले.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815224) Visitor Counter : 187