निती आयोग
अटल (इनोव्हेशन मिशनच्या) नवोन्मेष अभियानाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
10000 अटल टिंकरिंग लॅब; 101 अटल इनक्युबेशन सेंटर्स; 50 अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्सची स्थापना करण्यात येणार
200 (स्टार्टअप्सना) नवउद्यमांना अटल न्यू इंडिया चॅलेंजेसच्या माध्यमातून केले जाणार सहाय्य
2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित
Posted On:
08 APR 2022 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च 2023 पर्यंत अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. एआयएम देशात नवोन्मेषी संस्कृती आणि उद्योजकीय परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर काम करेल. एआयएमद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे हे केले जाईल.
एआयएमद्वारे साध्य होणारी उद्दिष्टे:
- 10000 अटल टिंकरिंग लॅबची (एटीएलएस) स्थापना करणे,
- 101 अटल इनक्यूबेशन सेंटर्स (एआयसीएस) स्थापन करणे,
- 50 अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स (एसीआयसीएस) स्थापन करणे आणि
- अटल न्यू इंडिया चॅलेंजद्वारे 200 नवउद्यमांना (स्टार्टअप्सना) सहाय्य करणे.
यांच्या उभारणी आणि लाभार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी 2000 कोटींपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे.
माननीय अर्थमंत्र्यांच्या 2015 च्या अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणेनुसार नीती आयोगाअंतर्गत या मिशनची स्थापना करण्यात आली आहे. शाळा, विद्यापीठ, संशोधन संस्था, एमएसएमई आणि उद्योग स्तरावरील सहभागाद्वारे देशभरात नवकल्पना आणि उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही एआयएमची उद्दिष्टे आहेत. एआयएमने पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संस्था उभारणी या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर नावीन्यपूर्ण परिसंस्था एकत्रित करण्यावरही काम केले आहे:
नावीन्यपूर्ण आणि उद्योजकतेवर आधारित समन्वयी सहयोग निर्माण करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय संस्थासोबत एआयएमने द्विपक्षीय संबंध निर्माण केले आहेत. एआयएम- एसआयआरआययूएस स्टुडंट इनोव्हेशन एक्सचेंज प्रोग्राम, एआयएम - आयसीडीके (इनोव्हेशन सेंटर डेन्मार्क) डेन्मार्कसह (पाण्यासंबंधित उपक्रम) वॉटर चॅलेंज आणि ऑस्ट्रेलिया सोबत, आयएसीई (इंडिया ऑस्ट्रेलियन सर्कुलर इकॉनॉमी हॅकेथॉन), भारत आणि सिंगापूर यांच्यात आयोजित इनोव्हेशन स्टार्टअप समिट, InSpreneur च्या यशात एआयएमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एआयएमने संरक्षण मंत्रालयासोबत भागीदारी करून डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली असून ती संरक्षण क्षेत्रात नवकल्पना तसेच खरेदीला चालना देत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, एआयएमने देशभरातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना एकत्रित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा प्रदान करण्याकरता काम केले आहे. आपल्या कार्यक्रमांद्वारे, त्याने लाखो शालेय मुलांमध्ये नवोन्मेषी मानसिकता घडवली आहे. एआयएम समर्थित स्टार्टअप्सनी सरकारी आणि खाजगी भागधारक गुंतवणूकदारांकडून 2000 कोटींपेक्षा अधिकचा निधी उभारला आहे. त्यासह हजारो रोजगारही निर्माण केले आहेत. एआयएमने राष्ट्रीय हिताच्यादृष्टीने अनेक नावीन्यपूर्ण आव्हाने देखील पार पाडली आहेत. एआयएम चे कार्यक्रम 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधे कार्यरत असून भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ घेण्याच्या उद्दिष्टाने नाविन्यपूर्ण परिसंस्थेमध्ये अधिक सहभागास प्रेरणा देत आहेत.
केन्द्रीय मंत्रिमंडळाने विस्ताराला मंजुरी दिल्यानंतर एआयएमवर, नाविन्यता आणि उद्योजकता यांना वाव देणे अधिक सोपे होईल अशी सर्वसमावेशक नवोन्मेषी परिसंस्था तयार करण्याची आणखी मोठी जबाबदारी आहे.
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814917)
Visitor Counter : 213