कृषी मंत्रालय

राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाचे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 05 APR 2022 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज हैदराबादच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेद्वारा (MANAGE) आयोजित नैसर्गिक शेतीवरील मास्टर ट्रेनर्ससाठीच्या  ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना  तोमर म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत देशातील 30 हजार ग्रामप्रमुखांसाठी 750 जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेला -(MANAGE)  सोपविण्यात आली  आहे. नैसर्गिक शेती पद्धती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे तोमर म्हणाले.

केंद्रीय मंत्री  तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पारंपारिक नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक शेतीचे महत्त्व लक्षात घेऊन, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 16 डिसेंबर 2021 रोजी गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीवर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले होते. नैसर्गिक शेती हे शेतकऱ्यांचे बाह्य सामग्रीवरील  अवलंबत्व कमी करून  लागवडीचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे एक आश्वासक साधन आहे. पारंपारिक स्वदेशी पद्धतींना चालना देण्यासाठी सरकार भारतीय नैसर्गिक शेती प्रणालीला (BPKP) पारंपरिक कृषी विकास योजनेची (PKVY) उप-योजना म्हणून प्रोत्साहन देत आहे. येत्या काही दिवसांत, प्रशिक्षित मास्टर ट्रेनर देशभरातील 30,000 ग्रामप्रमुखांसाठी 750 जागरुकता कार्यक्रम आयोजित करतील आणि त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा उपक्रम  पुढे नेण्यात मदत करतील. 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आले आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये नैसर्गिक शेतीवरील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था  दोनशे पंधरा मास्टर ट्रेनर्सना नैसर्गिक शेतीची ओळख, आणि सराव या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण देईल, जे 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण केले जाईल.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813860) Visitor Counter : 247


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil