रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पनवेल येथे 4135.91 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन


पनवेल शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चिरनेर-उरण-जेएनपीटी-चौक या नव्या महामार्गाची नितीन गडकरी यांनी केली घोषणा

Posted On: 04 APR 2022 2:36PM by PIB Mumbai

मुंबई, 4 एप्रिल 2022

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी पवनेल येथे झालेल्या कार्यक्रमात 4135.91 हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. यात, 3,500 कोटी रुपयांच्या जेएनपीटी बंदर रस्ते जोडणी प्रकल्पाचे लोकार्पण तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, कळंबोली जंक्शन सुधार प्रकल्प तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमीपूजन यांचा समावेश  आहे.

देशातील सर्वात मोठे कंटनेर हाताळणी बंदर असलेल्या जेएनपीटीची कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासठी बेलापूर, नेरुळ येथे जेट्टी मंजूर केल्या होत्या. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तर मुंबईतील कोणत्याही भागातून जलमार्गाने अवघ्या 13 ते 21 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल, असे गडकरी म्हणाले. वॉटरटॅक्सी सुरु करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

पनवेलमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांनी नव्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली. उरण-जेएनपीटी-चौक असा असणारा नवीन महामार्ग चिरनेरपासून सुरु होईल, या मार्गावर चार बोगदे आहेत. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पुणे-मुंबई जुना महामार्ग या तिन्ही रस्त्यांना जोडणारा असल्यामुळे पनवेलवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. 32 किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित मार्ग भारतमाला योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येईल. जेएनपीटी आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ हे राज्यासाठी विकास इंजिन असल्याचे गडकरी म्हणाले.

कळंबोली जंक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूकीचा ताण आणि प्रदुषणाचा त्रास कमी होईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेमुळे 1 लाख 85 हजार पीसीयुने  वाहतूक वाढेल. त्यासाठी  कळंबोली जंक्शनवरील  रस्ता हा चार स्तरीय  करण्यात येणार आहे. या जंक्शनच्या कामासाठी 1,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.

मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी 10 लाख क्षमतेची स्मार्ट सिटी उभारण्याची नितीन गडकरी यांनी सूचना केली. यापुढील काळात नियोजित विकास झाला पाहिजे. मुंबईचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास होय, असे गडकरी म्हणाले.

गेल्या सात वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर 10 हजार कोटी रुपये किंमतीची 18 कामे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी पाच कामे पूर्ण झाली आहेत, 13 कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच 1792.75 कोटी रुपये किंमतीची चार कामे प्रस्तावित आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

* * *

PIB Mumbai | JPS/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1813147) Visitor Counter : 421


Read this release in: English , Urdu , Hindi