उपराष्ट्रपती कार्यालय
देशातील युवकांमध्ये राष्ट्रवादाची मूल्ये निर्माण करायला हवी
Posted On:
26 MAR 2022 7:52PM by PIB Mumbai
देशातील युवकांमध्ये राष्ट्रवादाची मूल्ये निर्माण करायला हवी, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या हितांचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे प्रतिपादन नायडू यांनी केले.
युवकांनी समाजात परिवर्तनाचे वाहक व्हावे, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला, देशहिताच्या रक्षणासोबतच, देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि भाषिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करणे ही देखील युवकांची जबाबदारी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
भारत हा कायमच, ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वज्ञान मानणारा देश आहे, असे सांगत, जगभरात, वैश्विक बंधुभावाची भावना वृद्धिंगत करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, दिवंगत सोमपल्ली सोमय्या यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे पुस्तक “स्फूर्ति प्रदाता श्री सोमय्या’ चे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
सोमय्या यांच्या, राष्ट्रीय मूल्यांप्रती असलेल्या कटिबद्धतेबद्दल,गौरवपूर्ण भावना व्यक्त करत, उपराष्ट्रपती नायडू यांनी सर्व युवकांना, त्यांच्याविषयी वाचून, त्यांच्या कथांमधून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ‘देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांच्या मूल्यांवर वाटचाल करत, देशाच्या प्रगतीत आपले योगदान देणे, हीच या सर्वांना सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल,’ असे उपराष्ट्रपती म्हणाले.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810088)
Visitor Counter : 254