संरक्षण मंत्रालय

पश्चिमी नौदल कमांडने प्रस्थान या तटीय सुरक्षा सरावाचे केले आयोजन

Posted On: 25 MAR 2022 9:44PM by PIB Mumbai

 

पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाच्या अंतर्गत किनारी विकास क्षेत्रात (ODA) 23 मार्च 2022 रोजी,'प्रस्थान' हा तटीय सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला. दर सहा महिन्यांनी आयोजित केला जाणारा हा सराव किनारी भागात  सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक असून  तटीय सुरक्षेत  सहभागी असलेल्या सर्व सागरी हितधारकांच्या प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे हा  उद्देश आहे. नौदलाच्या नेतृत्वाखाली या सरावात भारतीय हवाई दल, तटरक्षक दल, ओएनजीसी  मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सीमाशुल्क, राज्य मत्स्य विभाग, सागरी व्यापार  विभाग आणि सागरी पोलिसांचा सहभाग होता. दिवसभर चाललेल्या या सरावातून  मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि मुंबईलगतच्या  किनारी संरक्षण क्षेत्रात अनेक आकस्मिक परिस्थितींसाठी  प्रतिसादात्मक उपाययोजना आखण्यात मदत झाली.

मुंबईच्या पश्चिमेला 38 सागरी मैल  अंतरावर स्थित ओएनजीसीच्या बी-193 प्लॅटफॉर्मवर हा सराव करण्यात आला.

दहशतवाद्यांची  घुसखोरी, बॉम्बस्फोट, अपघात झालेल्या  व्यक्तींना सुखरूप बाहेर काढणे, शोध आणि बचाव कार्य , भीषण  आग, तेलगळती आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची सुटका  यासारख्या आपत्कालीन कारवायांचा  सराव करण्यात आला. या सरावातून  सर्व संबंधितांना   आकस्मिक परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी तत्परता  तसेच एकत्रितपणे समन्वयित  पद्धतीने कृती  करण्याचा एक वास्तववादी अनुभव मिळाला.

या सरावाने सर्व अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण केली.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809871) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi