नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सागरमाला - उल्लेखनीय यशाची सात वर्षे


बंदरांवर  कंटेनर हाताळणीसाठी लागणारा वेळ 2013-14 मधील  44.70 तासांवरून 26.58 तासांपर्यंत कमी झाला  आहे

Posted On: 25 MAR 2022 5:09PM by PIB Mumbai

 

सागरमाला कार्यक्रमाच्या  सात वर्षांच्या  यशस्वी अंमलबजावणीच्या निमित्ताने  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची गेल्या  7 वर्षातली उल्लेखनीय कामगिरी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी  सागरमालाच्या मोबाईल अॅप्लिकेशनचा शुभारंभ केला.  बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यमंत्री शंतनू ठाकूर; सचिव डॉ.संजीव रंजन आणि  इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली  बंदरांची कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने सागरमाला कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. ते म्हणाले की  बंदरांवर कंटेनर हाताळणीसाठी लागणारा वेळ 2013-14 मधील  44.70 तासांवरून 26.58 तासांपर्यंत कमी झाला आहे.

ते म्हणाले की मंत्रालयाच्या प्रगती पुस्तकात  सागरमाला कार्यक्रमांतर्गत 5.48 लाख कोटी रुपये मूल्याच्या 802  प्रकल्पांचा उल्लेख आहे, जे   2035 पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 99,000 कोटी रुपयांचे 194 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 45,000 कोटीं रुपये खर्चाच्या एकूण 29 प्रकल्पांची  सार्वजनिक खासगी  मॉडेल अंतर्गत  यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी झाला आहे. शिवाय,  2.12 लाख कोटी रुपयांच्या  218 प्रकल्पांचे काम सुरु असून ते  2 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित  आहे. याशिवाय 2.37 लाख कोटी रुपयांचे 390 प्रकल्प  लवकरच सुरु केले जाणार आहेत.

कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा घटक असलेल्या बंदर  कनेक्टिव्हिटीसंबंधीचे  80 प्रकल्प आहेत. यामध्ये संपर्क व्यवस्था पुरवणारे  पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रमुख मार्गांवर कंटेनरची कार्यक्षम वाहतूक सक्षम करण्यासाठी मालवाहतूक-अनुकूल द्रुतगती मार्ग आणि धोरणात्मक अंतर्देशीय जलमार्गांचा विकास यांचा समावेश आहे. किनारपट्टीलगतच्या भागात औद्योगिक आणि निर्यात वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने बंदर-प्रणित  औद्योगिकीकरण हाती घेण्यात येत आहे. किनारपट्टीलगतच्या 14 किनारी आर्थिक क्षेत्र  (सेझ ) च्या माध्यमातून  हे प्रत्यक्षात साकारले जाईल. आणखी एक उल्लेखनीय उपक्रम, महाराष्ट्राच्या उत्तर किनार्‍यावरील वाढवण येथे  खोल समुद्रात  नवीन बंदर विकसित होत  आहे. हे बंदर अवजड कंटेनर वाहू जहाजांची  (UCLVs) वाहतूक सुलभ  करेल.

या कार्यक्रमादरम्यान प्रमुख बंदरांनी त्यांच्या सागरमाला प्रकल्पांची माहिती देणारे  प्रदर्शनही आयोजित केले होते.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809791) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu