पोलाद मंत्रालय
एनएमडीसी ने 40 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचा रचला इतिहास
Posted On:
19 MAR 2022 8:11PM by PIB Mumbai
पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम एनएमडीसी अर्थात नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC), देशातील सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक उपक्रम असून एका वर्षात 40 दशलक्ष टनाहून (MT) जास्त लोहखनिजाचे उत्पादन करणारी देशातील हा पहिली कंपनी ठरली आहे. 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात 4 दशलक्ष टन प्रति वर्ष उत्पादनापासून ते आता प्रति वर्ष 40 दशलक्ष टनांपर्यंत उत्पादन घेणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या लोह खनिज उत्पादकाच्या वाढीचा मार्ग असामान्य आहे. 1969-70 मध्ये 4 दशलक्ष टनापासून सुरुवात करून, एनएमडीसी ने 1977-78 मध्ये 10 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला, 2004-05 पर्यंत आणखी दहा दशलक्ष टनांची भर घातली, एका दशकात 30 दशलक्ष टन टप्पा पार केला आणि आता 40 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला आहे.
देशांतर्गत लोहखनिजाच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना, वाढीव उत्पादनासाठी कंपनी महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आणि भांडवली खर्चाची तरतूद करत आहे. अलीकडच्या काळात, एनएमडीसी ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे आणि कोविडमुळे आलेली मंदी आणि या क्षेत्रातील चक्रीय अस्थिरतेवर मात करण्यासाठी एक परिवर्तनात्मक डिजिटल पायाभूत सुविधा तयार केली आहे. प्रमाणापासून क्षमतेपर्यंत वाढून, कंपनीने स्थिर मूलभूत तत्त्वे आणि दूरदर्शी कार्यबळ यांच्या बळावर 40 दशलक्ष टन लोह खनिज उत्पादनाचा टप्पा गाठला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना, एनएमडीसी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित देब म्हणाले, “40 दशलक्ष टनाचा टप्पा ओलांडणारी भारतातील पहिली लोहखनिज खाण कंपनी बनण्याची एनएमडीसी ची अतुलनीय कामगिरी म्हणजे सर्व शक्यतांच्या पलीकडे जाऊन आव्हाने स्वीकारण्याच्या क्षमतेचे एक उल्लेखनीय प्रदर्शन आहे. कंपनीच्या चिकाटीचे आणि सातत्याचे फळ मिळाले आहे आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मी सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो.”
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807320)
Visitor Counter : 208