संरक्षण मंत्रालय

सीमा रस्ते संघटने (बीआरओ) ची उल्लेखनीय कामगिरी; श्रीनगर-कारगिल-लेह मार्गावरील जोझिला खिंडीतील रस्ता बंद झाल्यानंतर केवळ 73 दिवसांत वाहतुकीसाठी खुला

Posted On: 19 MAR 2022 7:53PM by PIB Mumbai

 

बीआरओ म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेने अत्यंत अद्भुत कामगिरी करत, लडाख आणि जम्मू कश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या श्रीनगर-कारगिल-लेह या  11,650 फुट उंच असलेल्या मार्गावरील जोझिला खिंडीतला मार्ग, आज म्हणजेच  19 मार्च 2022 पासून वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग बंद झाल्यापासून केवळ 73 दिवसांत तो पुन्हा सुरु करण्याचा ऐतिहासिक विक्रम बीआरओ ने केला आहे. याआधी 5 जानेवारी 2022 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होता, त्यानंतर बर्फवृष्टीमुळे तो बंद करण्यात आला होता. मात्र बीआरओ ने अत्यंत विपरित परिस्थितीत,रस्त्यावरील साचणारा बर्फ काढण्याचे काम अविरतपणे करत, केवळ 73 दिवसांत हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. 

15 फेब्रुवारी, 2022 पासून जम्मू काश्मीरच्या प्रोजेक्ट बेकन आणि लडाखच्या विजयक अशा दोन्ही बाजूंनी खिंडीत साचलेला बर्फ काढण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे, जोझिला खिंडीचा मार्ग दोन्ही बाजूंनी जोडण्याचे काम 4 मार्च पर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर, वाहने इथून सुरक्षितरित्या जाऊ शकतील यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे काम झाल्यावर, लडाखच्या लोकांसाठी आवश्यक मदत साहित्य घेऊन जाणारा पहिला ट्रक, झोझिला पासमार्गे कारगिलला पोहोचला. हिवाळ्यात होत असलेल्या अति बर्फवृष्टीमुळे हा मार्ग, साधारणत: 160 ते 180 दिवस बंद असतो.

यावेळी इतक्या लवकर हा मार्ग उघडण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यालाबीआरओ चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. बेकन आणि विजयक या दोन्ही मोहिमा यशस्वीरित्या फत्ते करणाऱ्या चमूचे कौतुक करत, राजीव चौधरी म्हणाले की यामुळे, देशाची संरक्षण सज्जता तर मजबूत होईलच, शिवाय, लडाखमधील लोकांपर्यंत आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठाही सुरळीतपणे होऊ शकेल. हा मार्ग मोकळा झाल्यामुळे, लडाख मध्ये सुरु असलेल्या, महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाचे साहित्य देखील, लडाख इथे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807319) Visitor Counter : 236