उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या उज्ज्वल परंपरांना शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा समाविष्ट केले पाहिजे- उपराष्ट्रपती


आपल्या प्राचीन ज्ञानदान पद्धती पुन्हा सुरु करून, त्या वर्तमानकाळाशी सुसंगत बनवायला हव्यात-उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा

Posted On: 19 MAR 2022 4:33PM by PIB Mumbai

 

भारताची समृद्ध, प्राचीन परंपरा देशाच्या शिक्षणक्षेत्रात पुन्हा एकदा समाविष्ट करण्याची गरज आहे. असे मत, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. त्यासाठी आपण प्राचीन काळातील ज्ञानदान परंपरा आणि पारंपरिक ज्ञान समजून घेत ते अधिक आधुनिक आणि कालसुसंगत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज हरिद्वार इथल्या दक्षिण आशियाई शांतता आणि सलोखा संस्थेचे उद्घाटन  झाले, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या,जगभर प्रसिद्ध असलेल्या,प्राचीन शिक्षण परंपरा परदेशी आक्रमक-शासकांच्या काळात लुप्त झाल्या, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

देशात दीर्घकाळ असलेल्या वसाहतवादी सत्तेमुळे देशातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला, यात महिलांचाही समावेश होता.केवळ उच्च वर्गातील मोजक्या लोकानांच औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे, असे केले तरच आपली शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक आणि लोकशाहीपूर्ण होऊ शकेल, असे ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आपल्या शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, त्यांनी आनंद व्यक्त केला. जे जे भारतीय आहे, ते सगळे हीन दर्जाचे आहे, असे समजणाऱ्या  मानसिकतेविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आपल्या मुळाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याच्या गरजेवर भर देत, उपराष्ट्रपती म्हणाले की कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी लहान मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, त्यांच्या संगतीत युवा पिढीला आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांची माहिती मिळू शकेल. तसेच निसर्गही आपला उत्तम गुरु असून, युवा पिढीने आपला जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या आयुष्यात मातृभाषेचे विशेष महत्त्व आहे असे सांगत, उपराष्ट्रपतींनी आपल्या मातृभाषेचा वापर, प्रसार आणि प्रचार करण्यावर भर दिला. मला भारतात असा दिवस बघण्याची इच्छा आहे जेव्हा दोन भारतीय व्यक्ती एकमेकांशी त्यांच्या मातृभाषेत संभाषण करतील, प्रशासनिक व्यवहार मातृभाषेत होतील आणि आदेश देखील लोकांच्या स्थानिक भाषेतच जारी केले जातील असे नायडू म्हणाले. न्यायालयीन कामकाजात देखील स्थानिक भाषांचा वापर केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज तणावग्रस्त जगाला, अनेक सामाजिक आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत असतांना, मानवतेच्या विकासासाठी, जगात शांतता आणि सलोखा नांदणे काळाची गरज आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. शांततेचा सर्व जगावर परिणाम होणे अपरिहार्य असते, त्यातूनच, सामाजिक सलोखा निर्माण होऊन,प्रगती आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो, असे ते म्हणाले. शांततेचा लाभांश’, समाजातील प्रत्येक हितधारकासाठी संपत्ती आणि सुख घेऊन येणारा असतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1807285) Visitor Counter : 302