वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतातील व्यापारी मालाची निर्यात जवळपास 390 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ती नक्कीच 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल - श्री पीयूष गोयल
भारतातील वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योगाने प्रथमच 600 दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या अधिक जास्त व्यापाराची नोंद केली आहे - श्री गोयल
Posted On:
17 MAR 2022 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, श्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताची व्यापारी निर्यात 14 मार्चपर्यंत जवळजवळ 390 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ती नक्कीच 400अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल.
नवी दिल्ली येथे ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA) द्वारे आयोजित आत्मनिर्भर उत्कृष्टता पुरस्कार सोहळा आणि 7 व्या तंत्रज्ञान शिखर परिषदेला गोयल संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, भारतातील वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योगाने प्रथमच 600 दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या अतिरिक्त व्यापाराची नोंद केली आहे.
भारताचा स्वयंचिलत वाहन उद्योग 100 अब्जडॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये 8% वाटा आहे आणि भारताच्या जीडीपी मध्ये त्याचा 2.3% वाटा आहे आणि 2025 पर्यंत तो जगातील 3रा सर्वात मोठा उद्योग बनणार आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.
कोविड-19 ची आव्हाने, कंटेनरचा तुटवडा, चिपचा तुटवडा, कमोडिटीच्या किमती आणि संघर्ष अशा पाच प्रकारच्या कठीण आव्हानांना न जुमानता उद्योग सुरू ठेवल्याबद्दल आणि तशा विपरीत परिस्थितीला तोंड देत, समायोजन करत विकसित झालेल्या वाहन उद्योगातील उद्योजकांचे त्यांनी कौतुक केले.
श्री गोयल म्हणाले, की सरकार स्वयंचलित वाहन उद्योग क्षेत्राशी संबंधित चिप्सच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीबद्दल संवेदनशील होते.76,000 कोटींच्या बजेटसह अलीकडेच मंजूर झालेला सेमिकॉन इंडिया हा उपक्रम आयात अवलंबित्व कमी करण्यात मदत करेल आणि अखेरीस चिप्सच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. गतीशील सरकार आणि वेगवान उद्योग एकत्रितपणे काम करून जगभरातील बाजारपेठा काबीज करू शकतात,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग उत्पादित करण्याच्या क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतांना अधोरेखित करत, गोयल यांनी वाहन उत्पादकांना भारतीय बनावटीच्या घटकांचा अधिकाधिक वापर करण्यास सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून श्री गोयल म्हणाले की, हवामान बदलाविरुद्धच्या आपल्या लढ्यात ‘मोबिलिटी’ हे पुढचे पाऊल आहे. भारत पुढील 15 वर्षांमध्ये घडून येणाऱ्या ई-मोबिलिटी क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील एकंदर परिदृश्यामध्ये सखोल संरचनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे असे प्रतिपादन गोयल यांनी केले. त्यांनी ऑटो-निर्मात्यांना शाश्वत संसाधनांकडे आव्हान म्हणून नव्हे तर विकासाची संधी म्हणून पहावे, असे सांगितले.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806957)
Visitor Counter : 172