नौवहन मंत्रालय
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) मध्ये पंतप्रधान गति-शक्ती कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प सुरू
गति-शक्ती अंतर्गत जेएनपीए मध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे देशाच्या सर्वसमावेशक प्रगती व विकासामध्ये नक्कीच मदत होईल - संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी
Posted On:
11 MAR 2022 3:39PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च, 2022
पीएम गति-शक्ती अंतर्गत जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे देशाच्या सर्वसमावेशक प्रगती व विकासामध्ये नक्कीच मदत होईल, असे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट चे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.
पंतप्रधान 'गती-शक्ती' - मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लान’च्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती व लाभ अधोरेखित करण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या वतीने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकारणाचे अध्यक्ष संजय सेठी, यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आणि प्राधिकरणाच्या प्रकल्पांचे गती-शक्तीच्या उद्दिष्ट पूर्तिमध्ये योगदान याविषयी माहिती दिली.
“जेएनपीए-सेझ, चौथा कंटेनर टर्मिनल, अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी सारखे प्रकल्प भारतातील बंदर-आधारित औद्योगिकीकरणासाठी मार्गदर्शक ठरतील असेही सेठी यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकल्पांमुळे आयात-निर्यात व्यापार अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
बंदर प्राधिकरणाने पंतप्रधान 'गती-शक्ती' कार्यक्रमांतर्गत अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.
पंतप्रधान 'गती-शक्ती' – राष्ट्रीय मास्टर प्लान अंतर्गत जेएनपीए मध्ये कोस्टल बर्थ, जेएनपीए –सेझ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा, चौथा कंटेनर टर्मिनल, रास्ते रुंदीकरण, वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट, रोपॅक्स/रोरो साठी बर्थिंग सुविधा, कॉमन रेलयार्ड, अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे आयात-निर्यात व्यापारास चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस सुद्धा गति मिळेल.
दरम्यान, जेएनपीए ने माध्यम प्रतिनिधींना व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण करून विविध प्रकल्पांची माहितीही दिली. यावेळी रेलवे, सीमाशुल्क, पीएसए मुंबई, आयपीआरसीएल, एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी व ज ने बंदर प्राधिकरणाचे विभागाध्यक्ष उपस्थित होते.
जेएनपीए हे अत्याधुनिक सुविधा पुरवणारे देशातील आघाडीचे बंदर आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर बंदर आहे.
पंतप्रधान 'गती-शक्ती' विषयी :
पंतप्रधान 'गती-शक्ती' कार्यक्रमाचे उद्दिष्ट लॉजिस्टिक खर्च कमी करणे, आयात-निर्यात व्यापार कार्यक्षम बनवण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि खर्च व वेळेची बचत करून आणि देशातील विकासाचा वेग वाढवून नागरिकांना फायदा देणे हे आहे. देशाच्या एकात्मिक आर्थिक विकासामध्ये या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. हा कार्यक्रम विकासाचे सात इंजिन - रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जन वाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक यावर आधारित आहे.
जेएनपीए विषयी :
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.
सध्या जेएनपीए येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805075)
Visitor Counter : 350