कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी पुसा कृषी विज्ञान मेळा - 2022 चे उद्घाटन केले
'बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत' , सरकार शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवत आहे - चौधरी
Posted On:
09 MAR 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा कृषी विज्ञान मेळा 2022 चे उद्घाटन केले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली -भारतीय कृषी संशोधन संस्थेने हा तीन दिवसीय कृषी मेळा आयोजित केला आहे. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE ) सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी चौधरी यांनी दोन एकरमध्ये विकसित "पुसा कृषी हाट कॉम्प्लेक्स" चे लोकार्पण केले. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था 'पुसा कृषी कृषी हाट कॉम्प्लेक्स' मध्ये त्यांच्या उत्पादनांचे थेट विपणन करू शकतील. या सुविधेमुळे ग्राहक थेट शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करू शकतील, ज्यामुळे त्यांची मध्यस्थांपासून मुक्तता होईल. शेतकरी उद्योजकतेला चालना देण्यासाठी या विशाल संकुलात 60 स्टॉल्स, हाट आणि दुकानांची व्यवस्था आहे. देशाच्या विविध भागातून हजारो प्रगतीशील शेतकरी, महिला उद्योजक आणि स्टार्टअप्स या मेळ्यात सहभागी झाले आहेत.
पुसा संस्थेतर्फे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून केंद्रीय राज्यमंत्री चौधरी यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी करत असलेल्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांना बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत सुविधा पुरवत आहे. शेतकऱ्यांची मेहनत आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे भारतीय शेती प्रगती करत आहे.
तरुणांमध्ये शेतीविषयी उत्कंठा जागृत होत आहे. चौधरी म्हणाले की, पंतप्रधानांनी कृषी मंत्रालयाच्या तरतुदीत सातत्याने वाढ केली असून ती आता 1.32 लाख कोटी रुपये झाली आहे, तर सात वर्षांपूर्वी ही तरतूद केवळ 23 हजार कोटी रुपये होती. विद्यमान अर्थसंकल्पातील तरतुदीत निम्म्याहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या रूपाने जमा केली जात आहे, याद्वारे सरकारने शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता व्यक्त केली आहे, तर स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारशी मोदी सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. चौधरी म्हणाले की, सरकारने अधिक पिकांवर दर वाढवून एमएसपी लागू करण्याबरोबरच खरेदी देखील वाढवली आहे. शेतकऱ्यांची मेहनत आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे डाळींसह अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवून देशाला आत्मनिर्भर करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे या सर्व प्रयत्नातून दिसून येते.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804582)
Visitor Counter : 304