अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मधील घोषणांची अंमलबजावणी वेगाने करण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या वतीने ‘वृद्धी आणि महत्वाकांक्षी अर्थव्यवस्थेसाठी वित्तपुरवठा’ या विषयावर अर्थसंकल्प पश्चात वेबिनार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवार- 8 मार्च, 2022 रोजी उद्घाटन सत्रामध्ये मार्गदर्शनपर भाषण
16 मंत्रालये, निती आयोग, क्षमता निर्माण आयोग, राज्य सरकारे, नियामक, उद्योग संस्था आणि गुंतवणूकदार विविध 5 सत्रांमध्ये सहभागी होणार
Posted On:
06 MAR 2022 6:40PM by PIB Mumbai
अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या घोषणांची कार्यक्षम आणि वेगाने, सुलभतेने अंमलबजावणी केली जावी, यासाठी सरकारच्या वतीने प्रमुख क्षेत्रांशी संबंधित वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे, शैक्षणिक आणि उद्योग या क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर विचारमंथन करणे तसेच विविध क्षेत्रांमध्ये ज्या समस्या आहेत, त्या संपुष्टात आणून अंदाजपत्रकातील घोषणांच्या अंमलबजावणीसाठी उत्तम पर्याय शोधून पुढे कसे जायचे, याविषयी धोरण निश्चित करण्यासाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या अर्थसंकल्प पश्चात वेबिनार मालिकेचा एक भाग म्हणून अर्थ मंत्रालयाच्या वतीने मंगळवार, दि. 8 मार्च, 2022 रोजी ‘‘वृद्धी आणि महत्वाकांक्षी अर्थव्यवस्थेसाठी वित्तपुरवठा’’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे.
या वेबिनारमध्ये सर्वोच्च स्तरावरील मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेबिनारच्या उद्घाटन सत्रामध्ये विशेष भाषण होणार आहे. या वेबिनारमध्ये 16 मंत्रालये, निती आयोग, क्षमता निर्माण आयोग, राज्य सरकारे यांचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर आरबीआय, सेबी यांच्यासारख्या नियामक संसथा, आयआरडीएआय, नाबार्ड, गिफ्ट सिटी, उद्योग संघटना, अर्थविषयक तज्ज्ञ, गुंतवणूकदार समुदाय सहभागी होणार आहेत.
या वेबिनारमध्ये पुढील संकल्पनांवर पाच विविध सत्रे असणार आहेत:-
1. पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा
2. उच्च रोजगार क्षमता असलेल्या क्षेत्रांना अर्थसाहाय्य
3. पायाभूत सुविधांची निर्मिती करणे
4. बँकिंग आणि वित्तपुरवठा यासाठी डिजिटल संधींचा शोध घेणे
5. हवामान आणि सनराईझ क्षेत्रासाठी शाश्वत अर्थसाहाय्य
या वेबिनारच्या माध्यमातून संकल्पनेवर आधारित निश्चित केलेला कार्यक्रम साध्य करण्यासाठी मौल्यवान माहिती मिळविण्याचा प्रयत्न अर्थ मंत्रालयाकडून केला जात आहे. यामध्ये सहभागी होणा-यांच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा लाभ घेवून, वृद्धीसाठी सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803371)
Visitor Counter : 186