उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

लोकप्रतिनिधींनी उच्च दर्जा राखत संसद आणि विधिमंडळांची प्रतिष्ठा जपण्याचा उपराष्ट्रपतींचा सल्ला


गोव्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक, साहित्यिक वारसा जपण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

गोवा राजभवनात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दरबार सभागृहाचे उद्घाटन

Posted On: 04 MAR 2022 4:03PM by PIB Mumbai

 

लोकप्रतिनिधींनी उच्च दर्जा राखत संसदेसारख्या संस्था आणि उच्च संवैधानिक स्थान असलेल्यांच्या कार्यालयांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपण्याचा सल्ला उपराष्ट्रपती, एम. वेंकय्या नायडू यांनी आज दिला.

गोवा राजभवनाच्या परिसरात नव्याने बांधलेल्या दरबार सभागृहाचे उद्घाटन त्यांनी केले. संसदेच्या कामकाजातील व्यत्यय आणि काही विधीमंडळांमधील नजीकच्या काळातील घडामोडींवर त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

भारत सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून निवडणुकांदरम्यान शांततापूर्ण परिवर्तन किंवा  आहे तेच शासन  जारी  ठेवण्याच्या माध्यमातून जगासमोर एक आदर्श उदाहरण घालून देत आहे असे ते म्हणाले.

गोव्याचे विशेष स्थान असल्याचे नायडू म्हणाले, "सांस्कृतिक आणि भाषिक विविधता, निसर्ग संपन्नता आणि इथल्या लोकांचा प्रेमळपणा, आदरातिथ्य यामुळे गोव्याचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान आहे." असे ते म्हणाले. गोव्याचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण वनराई, वनस्पती व प्राणी यांची विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे हे राज्य भारतातील पर्यटन स्थळांमध्ये अव्वल स्थानावर आहे असेही त्यांनी नमूद केले.

गोव्याला नैसर्गिक सौंदर्यासोबतच एक निकोप सामाजिक-राजकीय संस्कृती देखील लाभली आहे असे नायडू म्हणाले. गोव्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक, साहित्यिक वारसा जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आणखी काही आघाड्यांवर गोव्याची कामगिरी सरस असल्याचे सांगून दरडोई उत्पन्नात गोवा अग्रेसर आहे. देशातील सर्वात कमी गरीब राज्यांमध्येही तो आघाडीवर आहे असे नायडू यांनी सांगितले.

पारदर्शक भिंती आणि रुंद व्हरांड्यासह ही इमारत गोव्याच्या वास्तुकलेचे प्रतिबिंब आहे अशा शब्दात नायडू यांनी दरबार सभागृहाच्या भव्य संरचनेची प्रशंसा केली.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते  दिगंबर कामत आदी यावेळी उपस्थित होते.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803007) Visitor Counter : 224