वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वस्त्रोद्योग क्षेत्र, प्लास्टिक,पादत्राणे, वाहनांचे सुटे भाग, क्रीडा क्षेत्राशी संबंधित वस्तू, कृषी/अन्न प्रक्रिया यांसारख्या श्रम- केंद्रित क्षेत्रांमध्ये करोडो रोजगार निर्माण होऊ शकतात- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 24 FEB 2022 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2022

 

आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या पुनरुज्जीवन आणि पुनर्स्थापनेमध्ये भारत जास्तीत जास्त जबाबदार भूमिका निभावू शकतो असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.  भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) उत्पादनविषयक बैठक 2022 मध्ये उद्घाटनपर सत्राला त्यांनी आज संबोधित केले. कोविड-पश्चात जागतिक परिस्थितीत आपल्याला एक नवी रचना झालेले जग बघायला मिळणार असल्याचे ते म्हणाले.

“कोविड-पश्चात विश्वात आपल्याला एक नवी रचना असलेले जग पाहणार आहोत आणि आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था 3 ट्रिलीयन डॉलर्सची असली तरीही आपण अत्यंत धाडसी आणि आक्रमक लक्ष्यांची आस बाळगली पाहिजे. व्यक्तिगतरित्या मला असे वाटते की आपण अजूनही 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवू शकतो. पण तुम्ही सर्वांनी अत्यंत उत्साहाने या खूप खूप महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही,” असे उद्गार गोयल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणादरम्यान काढले.

“आपण सर्व एकत्रितपणे वस्त्रोद्योग क्षेत्र, प्लास्टिक,पादत्राणे, वाहनांचे सुटे भाग, क्रीडाक्षेत्राशी संबंधित वस्तू, कृषी/अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांमध्ये लाखो नाही तर करोडो रोजगार निर्माण करू शकतो, अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये श्रम हाच अत्यंत महत्वाचा मूल्य घटक आहे. हा आपल्याकडे असलेला स्पर्धात्मक किंवा तुलनात्मकरित्या अधिक फायद्याचा घटक आहे आणि त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे,” ते म्हणाले.

या आर्थिक वर्षात भारताची निर्यात 650 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आपल्या देशातील स्टार्ट अप्स भारताच्या तंत्रज्ञानविषयक गाथेमध्ये उत्कृष्ट यश मिळवत आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहेत. वर्ष 2022 मधील अवघ्या 53 दिवसांमध्ये आपल्याकडे 10 युनिकॉर्न उद्योग निर्माण झाले आहेत.”

समन्वयीत नियोजनाच्या तसेच मालवाहतूक खर्च कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या उद्दिष्टासह पंतप्रधान गतिशक्ती बहु पर्यायी संपर्क सुविधेच्या राष्ट्रीय महायोजनेचा वापर करून घेण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे, यावर गोयल यांनी भर दिला.

 

* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1800924) Visitor Counter : 222


Read this release in: English , Urdu , Hindi