संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माननीय राष्ट्रपती विशाखापट्टणम इथे नौदलाच्या ताफ्याची पाहणी करणार

Posted On: 19 FEB 2022 9:50PM by PIB Mumbai

 

भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 21 फेब्रुवारी 2022 रोजी विशाखापट्टणम इथे नौदलाच्या राष्ट्रपती ताफ्याची पाहणी करणार आहेत. अतिशय प्रेरणादायी आणि बहुप्रतिक्षित अशा या भेटीत राष्ट्रपती 60 जहाजे आणि पाणबुड्या आणि 55 लढाऊ विमानांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. हा राष्ट्रपतींचा बारावा ताफा आढावा असून भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना, 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा पाहणी दौरा होत असल्याने, त्याला विशेष महत्त्व आहे.

राष्ट्रपतींच्या या दौऱ्यासाठी वापरले जाणारे जहाज, स्वदेशी बनावटीचे असून, नौदल किनाऱ्यावर असलेले गस्ती जहाज- आयएनएस सुमित्रा ही असेल. या जहाजावर अशोक मुद्रा (मानचिन्ह) कोरलेली असून त्याच्या अग्रभागी प्रेसिडेन्ट्स स्टँडर्ड असेल. राष्ट्रपतींना राजशिष्टाचाराप्रमाणे समारंभपूर्वक मानवंदना आणि 21 बंदुकांची सलामी दिल्यानंतर, राष्ट्रपती आयएनएस सुमित्रावर जातील. विशाखापट्टणम बंदराच्या गोदीत उभ्या असलेल्या 45 जहाजांमधून राष्ट्रपतींचे जहाज रवाना होईल.

या पाहणीत भारतीय नौदल तसेच तटरक्षक दलाच्या नौका असतील. एससीआय आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयाची जहाजे देखील यात सहभाग घेतील. नौदलाच्या या सर्वात औपचारिक समारंभात विशेष सर्व प्रकारच्या सामग्रीने  सजविलेले प्रत्येक जहाज राष्ट्रपतींना ते पुढे जात असताना मानवंदना देईल. या वेळी राष्ट्रपती अनेक हेलिकॉप्टर आणि विमानांच्या नेत्रदीपक फ्लाय पास्टची देखील पाहणी करतील. या पाहणीच्या अंतिम टप्प्यात, युद्ध नौका आणि पाणबुड्यांचा ताफा राष्ट्रपतींच्या जहाजाजवळून जातील. या प्रदर्शनात भारतीय नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेली उपकरणे आणि जहाजे देखील प्रदर्शित केली जातील. याशिवाय, शिडाच्या बोटींचे संचलन, समुद्रात शोध आणि बचाव प्रात्यक्षिके, हॉक विमानांच्या हवाई कसरती आणि एलिट मरीन कमांडोद्वारे (MARCOS) वॉटर पॅरा जंप्स अशा अनेक आकर्षक कवायती सादर केल्या जातील.

या पाहणीनंतर माननीय राष्ट्रपती विशेष प्रथम दिन कव्हर आणि स्मरण तिकीट जारी करतील. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच दूरसंचार राज्य मंत्री देवूसिंह चौहान उपस्थित असतील.

या दिवशी गोदीतील जहाजे विविध झेंडे आणि संपूर्ण सामग्रीने सुसज्ज करून सजविलेली असतील  19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी सूर्यास्तापासून मध्यरात्रीपर्यंत या जहाजांवर रोषणाई केली जाईल, जी समुद्र किनाऱ्यावरून विशाखापट्टणमच्या नागरिकांना बघता येईल.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799704) Visitor Counter : 234


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi