उपराष्ट्रपती कार्यालय
भगवद्गीतेचा संदेश नेहमीच प्रासंगिक असल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन; धार्मिक नेत्यांनी तो तरुणाईपर्यंत आणि जनतेपर्यंत नेण्याचे केले आवाहन
Posted On:
19 FEB 2022 9:29PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनी आज चेन्नईतून पाचव्या जागतिक भगवद्गीता परिषदेचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले आणि संपूर्ण मानवतेच्या हितासाठी भगवद्गीतेचा सार्वत्रिक संदेश जास्तीत जास्त भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या गरजेवर भर दिला.
सेंटर फॉर इनर रिसोर्सेस डेव्हलपमेंट (CIRD), नॉर्थ अमेरिका द्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेली ही परिषद ‘मानसिक सुसंवाद’ या संकल्पनेवर केंद्रित आहे. संकल्पनेविषयी बोलताना, नायडू यांनी अधोरेखित केले की मानसिक ताण एक 'आधुनिक काळात सर्वव्यापी घटना' बनत आहे आणि 'गंभीर आरोग्य समस्येवर' अधिक जागरूकता आणि लक्ष देण्याचे आवाहन केले. भगवद्गीता जरी हजारो वर्षे जुनी असली तरी तिचा कालातीत संदेश लोकांसाठी प्रासंगिक राहतो, त्यांना मार्गदर्शन आणि मानसिक शांती पुनर्संचयित करण्यात मदत करतो, असेही ते म्हणाले.
अभ्यासाच्या दबावामुळे येणाऱ्या तणावाचा सामना न करता विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनांबद्दल उपराष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, कोणत्याही संकटाला निर्भयपणे सामोरे जाण्यास प्रवृत्त करणे आणि निकालाची चिंता न करता आपले कर्तव्य निष्ठेने करणे याविषयी त्यांनी पालक व शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ‘भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचे हे सार आहे’, असे ते म्हणाले.
श्री नायडू यांनी ‘लोकांच्या जीवनशैलीतील दिनक्रमात सुधारणा’ आणि लोकांच्या कल्याणासाठी कार्य-जीवन संतुलन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. तणावाचा सामना करण्यासाठी ध्यान, व्यायाम, योगासने असे उपाय सुचवून त्यांनी मानसिक आरोग्य राखण्यासाठी अध्यात्माचे महत्त्व सांगितले. “माझा ठाम विश्वास आहे की एखाद्याची आंतरिक शक्ती आणि मानसिक शांतता शोधण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. या संदर्भात मी धार्मिक नेत्यांना अध्यात्माचा संदेश तरुणाई आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो,” असे ते म्हणाले.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799702)
Visitor Counter : 217