आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आता तुमच्या आरोग्य सेतू ॲपवरुन तुमचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करा
आरोग्य सेतूचे 21 कोटी 40 लाखांहून अधिक वापरकर्ते या ॲपच्या मदतीने आता 14 अंकी विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक निर्माण करू शकतील
Posted On:
11 FEB 2022 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल अभियान या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अत्यंत लोकप्रिय आरोग्यविषयक ॲपचे एकीकरण करण्याची घोषणा केली आहे. या एकीकरणामुळे 14 अंकी विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक वापरण्याचे लाभ आता आरोग्य सेतू ॲपचे वापरकर्ते आणि त्यापलीकडे अनेकांना घेता येणार आहेत.
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत, वापरकर्ते त्यांचा विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतो. हा क्रमांक डॉक्टरांची औषधयोजना, प्रयोगशाळेतील तपासण्यांचे अहवाल, रुग्णालयातील नोंदी यांसह त्यांच्या सध्याच्या आणि नव्या आरोग्य विषयक नोंदींशी जोडता येतो आणि या नोंदी नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांशी सामायिक करता येतात. तसेच आरोग्यसंबंधी इतिहासाचा सामायिक साठा करतानाच नागरिकांना इतर डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ देखील घेता येतो.
या एकीकरणाबाबत अधिक तपशीलवार माहिती देताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा म्हणाले: आरोग्य सेतूचे आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रीकरण झाल्यामुळे, आपण आता अभियानाचे लाभ आरोग्य सेतू वापरणाऱ्यांना मिळवून देता येतील आणि त्यांची योग्य परवानगी घेऊन त्यांना डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी जोडून घेता येईल. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही सुरुवात असून आपण लवकरच तुमच्या आरोग्यविषयक डिजिटल नोंदी बघण्याची सुविधा देखील सुरु करू.”
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. वापरकर्त्याला त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि नाव, जन्मवर्ष (किंवा जन्मतारीख), लिंग आणि पत्ता (एकदा आधार ओटीपी द्वारे वापरकर्त्याची पडताळणी झाली की पत्ता आपोआप दिसू लागेल) यांसारख्या लोकसंख्याविषयक काही मुलभूत तपशीलांची माहिती वापरून हा क्रमांक मिळवता येईल. जर वापरकर्त्याला आधार क्रमांक वापरायचा नसेल तर वाहन चालविण्याचा परवाना अथवा मोबाईल क्रमांक वापरून देखील आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळविता येईल. वापरकर्त्याला त्याचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक https://abdm.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr या आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक ॲपवरुन मिळवता येईल अथवा आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रित करण्यात आलेल्या इतर ॲपचा वापर करून मिळवता येईल.
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाबद्दल अधिक माहिती https://abdm.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797817)
Visitor Counter : 445