माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रख्यात मणिपुरी नृत्यांगना सविता बेन मेहता यांचा व्यक्तिगत संग्रह भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट
Posted On:
11 FEB 2022 7:09PM by PIB Mumbai
मुंबई, 11 फेब्रुवारी 2022
मणिपुरी नृत्यशैलीच्या प्रख्यात नृत्यांगना सविता बेन मेहता यांच्या व्यक्तिगत संग्रहातील 'होम मूव्हीज' चा विपुल संग्रह आता NFAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट झाला आहे. 8 मिमी आणि सुपर 8 मिमी प्रकारच्या पटांचा हा संग्रह आहे. हा प्रकार खासगी पटांच्या चित्रणासाठी म्हणजेच होम मूव्हीजसाठी वापरला जातो. कोडाक्रोम आणि कोडाक्रोम II मधील होम मूव्हीजचा हा व्यक्तिगत संग्रह, सामाजिक दस्तैवजांच्या जपणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने NFAI ने तो अधिग्रहित केला आहे. कोडाक्रोम आणि कोडाक्रोम II अनुक्रमे 1935 आणि 1961 मध्ये विशेषतः हौशी व्यक्तींच्या वापरासाठी प्रचलित झाले. यापैकी कोडाक्रोम II ही, कोडाक्रोमपेक्षा अधिक वरचढ आवृत्ती आहे.
मणिपुरी नृत्यशैली भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील शृंगारिक भावबंधांचे दर्शन घडविते. सुंदर, आकर्षक वस्त्रालंकार, हावभाव आणि नाजूक सुकुमार हालचाली हे या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य. या शैलीच्या अद्वितीय नृत्यांगना सविता बेन मेहता यांनी हा नृत्यशैलीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. मणिपुरी नृत्यशैलीतील सर्वोच्च पात्रता आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि शिक्षण बडोद्याच्या आर्य कन्या विद्यालयात. दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून बॅले शैलीच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
"8 मिमी पटांचा इतका महत्त्वपूर्ण संग्रह मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. NFAI च्या दृष्टीने एका अत्यंत दुर्मिळ संग्रहाची भर पडली आहे. 1960 आणि 1970 च्या दशकांमध्ये 8 मिमी आणि सुपर 8 मिमी पट व्यापक स्तरावर प्रचलित होते. या संग्रहामध्ये त्यांच्या नृत्याच्या सादरीकरणांबरोबरच ईशान्य भारतातील चित्रणे असण्याची शक्यता आहे. या पटांचे लवकरच डिजिटायझेशन केले जाईल. सविताबेन मेहता यांचे पुतणे- उद्योजक जय मेहता यांच्या कुटुंबीयांचा मी ऋणी आहे."- अशा शब्दांत NFAI चे संचालक प्रकाश मगदूम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सविताबेन मेहता या अनेक भाषांमध्ये पारंगत होत्या. सदर चित्रणांमध्ये त्यांचे मणिपूरमध्ये प्रचलित मीती भाषेतील हस्ताक्षरही बघावयास मिळते.
सुप्रसिद्ध कलासंग्राहक दीप्ती शशिधरन (‘एका अर्काईव्हींग सर्व्हिसेस’ च्या संचालिका) आणि रॅशेल नोरोन्हा यांच्या प्रयत्नांतून हा संग्रह NFAI ला प्रदान करण्यात आला.
S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797741)
Visitor Counter : 196