आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अमेझॉन.इन या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीसाठी समर्पित विक्रीव्यवस्थेची केली सुरुवात

Posted On: 08 FEB 2022 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

नवी दिल्ली येथे झालेल्या आभासी कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते अमेझॉन.इन या मंचावर आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीसाठी समर्पित विक्रीव्यवस्थेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरुवातीला आयुर्वेद आणि त्याचे लाभ दर्शवणारा लघुव्हिडिओपट सादर करण्यात आला.

आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री करण्यासाठीच्या या ऑनलाईन विक्री व्यवस्थेमुळे अनेक छोट्या व्यवसायकर्त्यांनी आणि स्टार्ट अप ब्रँडनी उत्पादन केलेले विविध प्रकारचे रस, त्वचेची काळजी घेणारी पोषक उत्पादने, प्रतिकारशक्ती वाढविणारी उत्पादने, तेले यांसारख्या वैशिष्टयपूर्ण आयुर्वेदिक उत्पादनांचे अधिक चांगल्या प्रकारे सादरीकरण होईल. या ऑनलाईन  मंचावर वेदनाशामक, रोगप्रतिकारशक्ती वर्धक, रक्तशुद्धीकारक, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित, वजन व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य अशा विविध पर्यायांवर केंद्रित असलेल्या उत्पादनांची श्रेणी विषयानुरूप सुनियोजित पद्धतीने उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना या मंचाद्वारे खरेदी करणे सुलभ होणार आहे.

आभासी पद्धतीने पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, कोविड-19 प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयुर्वेदिक, सिद्ध तसेच होमिओपॅथिक औषधांचे शास्त्रीयदृष्ट्या विकसन होणे जसे आवश्यक आहे तसेच या उत्पादनांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे उत्तम विपणन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अमेझॉन मंचाने त्यांच्या ई-वाणिज्य मंचाच्या माध्यमातून च्यवनप्राश, आयुष काढा किंवा आयुष-64 सारख्या उत्पादनांचे खात्रीशीरपणे वितरण करून या उत्पादनांची पुरवठा साखळी बळकट करण्यात मोठा हातभार लावला आहे. एक देश म्हणून आपण सर्वांनी देशातील लहान-मोठ्या कंपन्या तसेच स्टार्ट अप्सना आयुष उपचारपद्धतीला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे जेणेकरून त्यातून पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत निर्माणाचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले मार्गक्रमण होईल.

कोविड पासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने विकसित केलेल्या आयु-रक्षा किट, बाल-रक्षा किट आणि स्वास्थ्य रक्षा किट यांची देखील जाहिरात करत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ही सर्व किट्स म्हणजे संशमनी वटी, अणु तैल, आयुष क्वाथ आणि च्यवनप्राश यांसारख्या विविध प्रकारच्या 3 ते 4 औषधांचा कॉम्बो-पॅक आहे. ई-वाणिज्य मंचाच्या माध्यमातून अमेझॉनवर ही किट्स सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले


* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796662) Visitor Counter : 242