वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक विजेते म्हणून एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह 46 स्टार्टअप्सच्या नावांची घोषणा
“स्टार्टअप इंडिया म्हणजे लाखो लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग”-पीयूष गोयल
स्टार्ट अप अभियान हे आत्मनिर्भर आणि आत्म-विश्वासपूर्ण भारताचे प्रतीक : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Posted On:
15 JAN 2022 10:00PM by PIB Mumbai
“स्टार्ट अप इंडिया म्हणजे लाखो लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग आहे,” असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. वर्ष 2021 साठीच्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, स्टार्ट अप अभियान हे आत्म-निर्भर आणि आत्म-विश्वासपूर्ण भारताचे प्रतीक आहे.
“चेन्नई येथील एका मच्छिमाराचा मुलगा असो किंवा काश्मीरमध्ये बोट चालविणाऱ्याची मुलगी, या सर्वांनाच त्यांच्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी समृद्धता आणायची आहे आणि म्हणूनच ते अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अधिक धाडसाने विचार करत आहेत”, असे गोयल पुढे म्हणाले.
भारताला जगातील पहिल्या क्रमांकाची स्टार्टअप व्यवस्था म्हणून घडविण्यासाठी मुख्यतः पाच क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली:
1. समस्यांवरील उपाय आणि साहित्य भारतीय भाषांमध्ये विकसित करणे
2. अधिक मोठ्या प्रमाणावर सामाजिक तसेच आर्थिक परिणाम घडविणारी उत्पादने आणि उपाय यांना प्रोत्साहन देणे.
3. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात स्टार्ट अप्सच्या विकासाला प्रोत्साहन देणे- प्रत्येक जिल्ह्यात ‘स्टार्ट अपपर्यंत पोहोचण्याची सुविधा देणारी केंद्रे’ स्थापन करणे.
4. नागरी स्थानिक संस्थांच्या पातळीवर अभिनव संशोधन विभाग निर्माण करणे आणि
5. जगभरातील उत्तम प्रक्रिया आत्मसात करणे आणि भारताची वैश्विक स्पर्धात्मकता अधिक वाढविणे.
या सन्मान सोहोळ्यासोबतच राष्ट्रीय स्टार्टअप पारितोषिकांच्या पहिल्या आवृत्तीमधील अंतिम फेरीच्या विजेत्यांना वर्षभर देण्यात आलेले सहकार्यात्मक पाठबळ आणि 2021 च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिकांचा संपूर्ण प्रवास याविषयीच्या माहितीवर भर देणारा ई-अहवाल देखील जारी करण्यात आला.
या कार्यक्रमात, 2021 च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी, एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह एकूण 46 स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा करण्यात आली.
या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 15 क्षेत्रे आणि 49 उप-क्षेत्रे यांमधून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये कृषी, पशुपालन,पेयजल, शिक्षण आणि कौशल्यविकास, उर्जा,उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि स्वास्थ्य, उद्योग 4.0, अवकाश क्षेत्र तसेच वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांचा समावेश आहे. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विलक्षण स्टार्टअप्सच्या कार्याला ओळख प्राप्त करून देण्यासाठी सहा विशेष श्रेणी देखील निर्माण करण्यात आल्या होत्या. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी नवोन्मेषी उपाय शोधणाऱ्या तसेच कोविड-19 महामारी विरुद्ध राष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या उपाययोजनांना पूरक ठरणारे कार्य करणाऱ्या असामान्य स्टार्ट अप्सना देखील या पुरस्कारांच्या 2021च्या आवृत्तीमध्ये सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा :
1. राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक 2021 च्या विजेत्यांची यादी
2. राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक 2021 च्या विजेत्यांच्या कार्याचे तपशीलवार सादरीकरण
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790232)
Visitor Counter : 303