संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर - 2022 चे उद्घाटन केले
Posted On:
04 JAN 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (DG NCC) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 4 जानेवारी 2022 रोजी दिल्ली छावणी येथे एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर - 2022 चे औपचारिक उद्घाटन केले. उद्घाटन समारंभाला 'सर्व धर्म पूजा' ने प्रारंभ झाला.
प्रजासत्ताक दिन शिबिर हे एनसीसी छात्रसैनिकांच्या पूर्ण एक वर्षाच्या प्रशिक्षणाच्या शेवटी आयोजित केले जाते आणि दरवर्षी 1 ते 29 जानेवारी दरम्यान दिल्ली कॅन्टोन्मेंट इथल्या परेड मैदानावर आयोजित केले जाते. या शिबिरात देशभरातून खास निवडलेले सुमारे 2,200 छात्रसैनिक सहभागी होतात. महिनाभर चालणाऱ्या शिबिरात प्रशिक्षणातील आंतर संचालनालय स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय एकात्मता जागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी 26 जानेवारीला राजपथवरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दोन एनसीसी मार्चिंग तुकड्या सहभागी होतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराची संकल्पना ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अशी आहे.
प्रजासत्ताक दिन शिबीर- 2022 संपूर्ण कोविड-19 प्रोटोकॉलच्या अंतर्गत आयोजित केले जात आहे, यावर्षी एकूण छात्रसैनिकांची संख्या 1,600 पर्यंत कमी ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 17 राज्य संचालनालयांमधून निवडलेल्या 560 मुलींचा समावेश आहे. 28 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधानांच्या रॅलीने शिबिराची सांगता होईल.
यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी छात्रसैनिकांचे स्वागत केले आणि एनसीसीच्या सर्वात प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी छात्रसैनिकांना व्यक्तिमत्व , परिपक्वता आणि निःस्वार्थ सेवा तसेच शिस्त आणि आचरणाचे सर्वोच्च दर्शन घडवण्याची आणि इथल्या त्यांच्या वास्तव्यादरम्यान प्रदेश, भाषा, जात आणि पंथ हे अडसर पार करून सौहार्द आणि सांघिक कृतीची भावना राखण्याची सूचना केली.
एनसीसी महासंचालकांनी छात्रसैनिकांना मनापासून सहभागी व्हायला सांगितले आणि महिनाभर चालणाऱ्या शिबिरातल्या प्रत्येक उपक्रमातून जास्तीत जास्त लाभ उठवायला आणि त्याचवेळी योग्य कोविड -19 प्रतिबंधक प्रोटोकॉलचे पालन करायला सांगितले. ते पुढे म्हणाले की, छात्रसैनिकांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांची मूल्य व्यवस्था अधिक बळकट करणे आणि राष्ट्राच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे हा या शिबिराचा उद्देश आहे.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787476)