उपराष्ट्रपती कार्यालय

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेच्या बाबतीत महात्मा गांधींच्या "नई तालीम" चा अवलंब करण्यात आला आहे : उपराष्ट्रपती


महात्मा गांधींनी मातृभाषेला स्वराज्याशी जोडले : उपराष्ट्रपती

भाषिक एकता मजबूत करण्यासाठी भारतीय भाषांमध्ये संवाद वाढवण्याची गरज - उपराष्ट्रपती

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले

उपराष्ट्र्पतींनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि अटलबिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्‌घाटन केले

Posted On: 04 JAN 2022 5:04PM by PIB Mumbai

वर्धा, 4 जानेवारी 2022

 

शालेय स्तरावर मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व देऊन नवीन शैक्षणिक धोरणात महात्मा गांधींच्यानई तालीमचा अवलंब  करण्यात आला आहे असे उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला ते संबोधित करत होते. 1937 मध्ये महात्मा गांधींनी वर्धा येथे प्रस्ताव मांडलेल्या "नई तालीम" मध्ये विद्यार्थ्यांना मोफत अनिवार्य  शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याबरोबरच  मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनवण्यावर भर दिला होता, याची   उपराष्ट्रपतींनी यावेळी आठवण करून दिली.

नायडू म्हणाले की, आपल्या संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर हिंदीचा  अधिकृत भाषा म्हणून स्वीकार केला आणि आठव्या अनुसूचीमधील इतर भारतीय भाषांनाही घटनात्मक दर्जा दिला. प्रत्येक भारतीय भाषेचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध साहित्य असल्याचे सांगून ते म्हणाले, "आपल्या देशात भाषिक वैविध्य  आहे हे आपले भाग्य आहे. आपल्या भाषा आपल्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असल्यामुळे आपले  भाषिक वैविध्य ही आपली ताकद आहे"

भाषा संदर्भात  महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यासाठी भाषेचा प्रश्न हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न होता. हिंदीचा आग्रह धरूनही महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाची मातृभाषेबद्दलची संवेदनशीलता समजून घेतल्याचे  त्यांनी नमूद केले. गांधीजींनी मातृभाषेला स्वराज्याशी जोडले आणि तिला योग्य महत्त्व देण्याचे आवाहन केले, असे ते म्हणाले. अनिवासी  भारतीय समुदायाला मातृभूमीशी जोडून ठेवण्यात भारतीय भाषांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही ते म्हणाले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, सुसंस्कृत समाजाची भाषा सौम्य , सुसंस्कृत आणि सर्जनशील असणे अपेक्षित आहेते म्हणाले, " भाषेची  सभ्यता  आणि शब्दांचा शिस्तबद्ध वापरासह आपले   अभिव्यक्ती स्वातंत्र्य आचरणात आणूया ."

यावेळी उपराष्ट्रपतींनी  राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण  केलेडॉ.आंबेडकर आयुष्यभर शिक्षण आणि समतेसाठी कटिबद्ध राहिले, असे ते म्हणालेडॉ.आंबेडकर यांचा पुतळा वर्धा विद्यापीठातील शिक्षक आणि  विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत  ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 उपराष्ट्रपतींनी आज विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाचा भाग म्हणून अटल बिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे देखील उद्घाटन केले. माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचे स्मरण करताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र महासभेतले  अटलजींचे हिंदीतील भाषण हा देशासाठी एक ऐतिहासिक क्षण  होता.

अमर क्रांतीकारक  चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे लोकार्पण करताना उपराष्ट्रपतींनी युवा पिढीला आपल्या वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाबाबत जागरूक करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी युवकांना  जाती, धर्म, लिंग आणि प्रांत याच्या पलिकडे  जाऊन देशाची  एकता मजबूत करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

वर्धा विद्यापीठाच्या कामगिरीचे कौतुक करताना  नायडू म्हणाले की, विद्यापीठाने हिंदी भाषेतील  प्रसिद्ध साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यामुळे परदेशातल्या वाचकांना अस्सल हिंदी साहित्य उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

या संदर्भात, इतर भारतीय भाषांमधील साहित्यही त्याच्या हिंदी अनुवादासह ऑनलाइन उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीआपली भाषिक विविधता ही देशाची ताकद आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी विविधतेतील एकतेचा हा धागा आणखी बळकट करण्याचे आवाहन केले आणि भारतीय भाषांमधील संवाद वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. विद्यापीठांच्या भाषा विभागांनी याबाबत महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी सूचना त्यांनी केली. "विद्यापीठांच्या भाषा विभागांमध्ये नियमित  संपर्क आणि बौद्धिक संवाद असायला हवा," ते म्हणाले.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात  फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, जपानी आदी परदेशी भाषा हिंदी माध्यमातून शिकवल्या जातातयाबद्दल आनंद व्यक्त करून नायडू यांनी ही सुविधा इतर भारतीय भाषांसाठीही अंमलात आणण्याचे आवाहन केले जेणेकरून हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनाही  इतर भारतीय भाषा शिकता येतील.

 1975 मध्ये नागपुरात झालेल्या जागतिक हिंदी परिषदेत आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 1997 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाद्वारे वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि 2022 मध्ये या विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी सोहळा पार पडत आहे.

महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या जीवनविषयक  तत्वज्ञानाचे  साक्षीदार असलेले वर्धा ही पवित्र भूमी असल्याचे सांगून  नायडू म्हणाले की, वर्धा हे देशासाठी प्रेरणास्थान आहे.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि  सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले, वर्ध्याचे खासदार  रामदास तडस, कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ला, परिसरातील लोकप्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी  उपस्थित होते.

आज उद्‌घाटन झालेल्या वास्तूंची माहिती:-

आज दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्याचे  लोकार्पण करण्यात आले. हा पुतळा सुमारे नऊ फूट उंच चबुतऱ्यावर उभारलेला आहे. पुतळ्याची उंची सहा फूट आहे. पुतळा बाबासाहेबांचे  अध्ययन- मग्न  रूप प्रदर्शित करतो.

आजच अटल बिहारी वाजपेयी भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या भवनात सुमारे 15 खोल्या/हॉल आहेत ज्यांचा वापर विविध विभागांसाठी केला जाणार आहे.

विद्यापीठात चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचा देखील लोकार्पण झाले. खास मुलांच्या वापरासाठी हे बांधण्यात आले आहे. यामध्ये शंभर खोल्या आहेत ज्यामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी आरामात राहू शकतात.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787428) Visitor Counter : 276