रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात 3,840 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहा प्रकल्पांची आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी आणि उद्घाटन


गोव्याला जागतिक दर्जाचे प्रदूषणमुक्त राज्य म्हणून प्रस्थापित करण्याचे केले आवाहन

हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून त्याच्या वापरावर भर देण्याचे गोवा सरकारला केले आवाहन

Posted On: 03 JAN 2022 7:17PM by PIB Mumbai

मुंबई/पणजी, 3 जानेवारी 2022

 

गोव्याच्या विकासात, गोव्याला एक समृध्द, संपन्न राज्य म्हणून घडवण्यात केंद्रीय मंत्री म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गडकरी यांच्या हस्ते गोव्यात 3,840 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोव्याच्या विकासासाठी 15,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची मागणी असताना, प्रत्यक्षात 22,000 कोटींहून अधिक खर्च करता आला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

बंदर ते महामार्ग जोडणी हा 546 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प, तसेच वेरणा  ते  सडा जंक्शन  यासह मते मुरगाव बंदर- गेट 1 लूप मार्ग, मडगावच्या अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी कमी करणारा मडगाव पश्चिम बायपास अशा अनेक प्रकल्पांची आज त्यांच्या हस्ते पायाभरणी आणि उद्घाटन झाले. 

गोव्यातील सर्व प्रकल्पांच्या कामाचा दर्जा उत्तम आहे, झुआरी नदीपुलावर निरीक्षण मनोरे उभारण्याच्या प्रकल्पाची आज पायाभरणी झाली यावेळी त्यांनी सांगितले की अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेला पूल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे सांगत येथील तलावात तरंगते उपाहारगृह उभारण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला.

गोव्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी तळमळीने धडपड करणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आणि त्यांच्या अथक प्रयत्नांची देखील गडकरी यांनी आठवण काढली. गोव्यातील वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करून गोव्याला जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले प्रदूषणमुक्त राज्य म्हणून आकाराला आणता येईल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. फ्लेक्स प्रकारच्या इंजिनांचा वापर करणारी वाहने यापुढे अधिक प्रमाणात चालविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून, यातून प्रदूषण कमी होण्याबरोबरच आपल्या शेतकऱ्यांना देखील त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करता येईल असे ते म्हणाले. सौर आणि पवन उर्जा प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज वापरून हरित हायड्रोजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

गोवा राज्यात सर्व प्रकारचे उद्योग येत आहेत, उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सुविधा निर्माण होत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करत गडकरी यांनी उत्तम दर्जाचे प्रकल्प ही राष्ट्राची संपत्ती असते याचा विशेष उल्लेख केला. 

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा सदस्य विनय तेंडूलकर  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे :

  • राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील पत्रादेवी ते करासवाडा या 18 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम
  • मडगाव पश्चिम बायपास प्रकल्प 
  • राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील करासवाडा ते बांबोळी या 13 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम
  • मुरगाव बंदराला जोडणारा लूप-1 मार्ग 

गडकरी यांनी खालील तीन प्रकल्पांची कोनशीला आज ठेवली:

  • मोपा विमानतळाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.1665 ची उभारणी
  • झुआरी नदीवरील पुलावर निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी
  • केंद्रीय पायाभूत सुविधा निधीतून होणारी मार्गांची 6 विविध कामे

* * *

Jaydevi PS/S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787213) Visitor Counter : 293


Read this release in: English , Urdu , Hindi