वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतासाठी व्यवसाय संधींचा लाभ उठवण्यासाठी आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी भारतीय निर्यातदार आणि उद्योजकांशी साधला संवाद
संयुक्त अरब अमिरातीचा अग्रणी व्यापारी भागीदार बनवण्याचे ध्येय - वाणिज्य मंत्री पीयूष गोयल
भारतात गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 अब्ज डॉलर देण्याची संयुक्त अरब अमिरातीची वचनबद्धता : पीयुष गोयल
जागतिक बाजारपेठेतील संधीचे सोने करण्याची भारतासाठी ही योग्य वेळ: डीपी वर्ल्ड समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
"थोडीशी भारताची झलक संयुक्त अरब अमिराती मध्ये, थोडीशी संयुक्त अरब अमिरातीची झलक भारतात": वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिराती मधील वाढत्या हितसंबंधांचा दिला संदर्भ
प्रमुख भारतीय निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग प्रतिनिधींचा चर्चेत सहभाग
Posted On:
18 DEC 2021 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2021
संयुक्त अरब अमिरातीद्वारे देऊ केलेल्या व्यावसायिक व्यासपीठांचा आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेऊन भारतीय उद्योजकांसाठी जागतिक स्तरावर त्यांचा ठसा वाढवण्याच्या काही संधींवर चर्चा करण्यासाठी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत भारतीय उद्योग क्षेत्रातील आणि निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या प्रमुखांशी संवाद साधला.
डीपी वर्ल्ड या संयुक्त अरब अमिराती सरकारच्या पूर्ण मालकीच्या आघाडीच्या स्मार्ट लॉजिस्टिक प्रदात्याने भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांना देत असलेल्या बाजार विस्ताराच्या संधींचे सादरीकरण केले. ही कंपनी भारतीय व्यवसायांसाठी एका समर्पित बाजारपेठेची म्हणजे भारतीय व्यापारपेठ व्यापारी बाजारपेठेची (इंडिया मार्ट ट्रेडर्स मार्केट)ची स्थापना करत आहे.यामुळे व्यापारी आणि उत्पादकांना संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक बाजारपेठ आणि प्रादेशिक बाजारांमध्ये व्यापार करण्यासाठी सहाय्य्यकारी ठरेल.\
जगातील अग्रगण्य मुक्त व्यापार क्षेत्रांपैकी एक असलेल्या दुबईच्या जेबेल अली फ्री झोनने (जाफ्झा) देऊ केलेल्या संभाव्य संधींचे सादरीकरण केले.
डीपी वर्ल्ड आणि संयुक्त अरब अमिराती सरकारने सादर केलेल्या संयुक्त अरब अमिरातीमधील संधीबद्दल बोलताना मंत्र्यांनी सहकार्याबाबतचा आपला दृष्टोकोन अधोरेखित केला. आणि भारताच्या निर्यातदार समुदायासाठी या एक उत्तम संधींचा लाभ घेण्यासाठी भारतीय निर्यातदार आणि व्यापार्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ''आम्ही याकडे भारतासाठी 10 अब्ज डॉलर्सची व्यापार संधी म्हणून बघत असल्याचे ते म्हणाले.
उद्योग प्रतिनिधीनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि आपल्या कल्पना आणि सूचना मांडल्या.
"संयुक्त अरब अमिरातीचा प्रथम क्रमांकाचा व्यापारी भागीदार बनणे हे आमचे ध्येय आहे"
संयुक्त अरब अमिराती हे आखाती सहकार्य परिषद आणि संपूर्ण आफ्रिकेचे प्रवेशद्वार आहे असे ते म्हणाले.
भारतीय उद्योगांसाठी किफायतशीर वित्तपुरवठा यासारख्या उपायांसह संवादात सहभागी होण्यासाठी दुबईवरून आलेले डीपी वर्ल्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महामहिम सुलतान अहमद बिन सुलेम यांचे मंत्र्यांनी आभार मानले.
गोयल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवराज एचएच शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यादरम्यानचे स्नेहबंध आम्हाला उच्च महत्वाकांक्षा बाळगण्यास मदत करत आहेत.
केवळ संयुक्त अरब अमिराती मध्येच नव्हे तर संयुक्त अरब अमिरातीचा स्प्रिंगबोर्ड म्हणून वापर करून आखात सहकार परिषद GCC आणि आफ्रिकेतील इतर बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवण्यासाठी एक आराखडा तयार करण्यासाठी चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मंत्र्यांनी निर्यातदारांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्र्यांनी वाटाघाटी आणि परिपूर्णतेच्या प्रगत टप्प्यात असलेल्या भारत-यूएई मुक्त व्यापार करारातून अपेक्षित असलेले अत्यंत अनुकूल परिणाम सामायिक केले. "आम्ही संयुक्त अरब अमिराती सोबत मुक्त व्यापार कराराला वाटाघाटीतून अंतिम रूप देत असताना, अनेक क्षेत्रांतून बर्याच चांगल्या बातम्या येत आहेत."
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील मैत्रीची साक्ष देणारी तीन उदाहरणे केंद्रीय मंत्रांनी सांगितली. आतापर्यंतच्या काळात सर्वात प्रथम यूएईने भारताला मंदिर उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यातून एक मोठा संदेश दिला गेला आहे. यूएई हा देश त्याच्या निर्मितीचे 50 वे वर्ष साजरे करत आहे तर भारत स्वातंत्र्य प्राप्तीचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. दुसरे म्हणजे, भारतात गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी यूएईने 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स साठी कटीबद्धता दर्शवली आहे. आणि तिसरे असे की, यूएई-भारत मुक्त व्यापार करार हा या दोन देशांमध्ये आतापर्यंत सर्वात कमी कालावधीत वाटाघाटी झालेला आणि सर्वात वेगाने वाटाघाटी पार पडलेला समावेशक आर्थिक भागीदारी करार आहे आणि त्यातून भारताला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.”
निर्यातदार आणि उद्योग क्षेत्र,डीपीवर्ल्ड कंपनीचे गटप्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महामहीम सुलतान अहमद बिन सुलायेम यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील बाजार आणि भारतीय उत्पादनांना त्यात उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती दिली. जेबेल अली आर्थिक परिक्षेत्रात शेकडो गोदामे आहेत जी बाजार पाहण्याची आणि अनुभवण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यापाऱ्यासाठी उपयुक्त आहेत. जागतिक बाजारपेठेतील संधीचे सोने करण्याची भारतासाठी ही योग्य वेळ आहे. सर्वत्र मोठी कमतरता आहे, जी भारत भरून काढू शकतो.”
डीपी वर्ल्ड कंपनीच्या व्यापार माहिती विभागाचे प्रमुख अब्दुल्ला अल हाश्मी यांनी इंडिया मार्ट ट्रेडर्स मार्केट आणि जेबेल अली फ्री झोन या जोड प्रकल्पांच्या क्षमतेबाबत उद्योगजगातला माहिती दिली. “दुबई हे संपूर्ण जगाशी जोडलेले शहर आहे.मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादित वस्तूंना जगभरात निर्यात करण्यासाठी मदत करण्याची आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.
चर्चेदरम्यान, शरद कुमार सराफ, यांनी मत व्यक्त केले की इंडिया मार्ट ट्रेडर्स मार्केट उघडण्याचा भारतीय निर्यात संघटना महासंघ FIEO चा निर्णय हा उचित वेळी घेतलेला आणि अतिशय महत्त्वाचा आहे.
कौन्सिल ऑफ लेदर एक्स्पोर्ट्सचे प्रादेशिक अध्यक्ष नरेश भसीन, यांनी सांगितले की, टच-अँड-फील व्यतिरिक्त, स्पीड-टू-मार्केट हा एक महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे ग्राहक पहात आहेत. युएईमध्ये भांडवली खर्च स्वस्त आहे आणि दुबईमध्ये चामड्याच्या उद्योगासाठी इंडिया मार्ट ट्रेडर्स मार्केटची स्थापना अतिशय आकर्षक असेल, असेही ते म्हणाले.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI)चे सदस्य अमित सारडा, यांनी सांगितले की डीपी वर्ल्ड द्वारे इंडिया मार्ट सुविधा निर्माण केल्याने भारताचे मेड इन इंडिया आणि मेड फॉर द वर्ल्डचे उद्दिष्ट व्यापक होईल. “एमएसएमई आणि स्टार्ट-अप व्यवसाय वाढवतात म्हणून, त्यांना इंडिया मार्टमध्ये प्रवेश प्रदान करण्याबद्दल आपण चर्चा करणे आवश्यक आहे.” मार्टमध्ये गोदामांची सुविधा देण्यासोबतच पॅकेजिंगचीही सुविधा असावी, असे ते म्हणाले.
सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि ब्लू स्टार लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक त्यागराजन म्हणाले, “भारत-संयुक्त अरब अमिरातीमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे आणि धोरणात्मक भागीदारीसाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. आजचा संवाद हा मजबूत द्विपक्षीय संबंधांमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि संबंधांचे एक उदाहरण आहे.”
प्लॅस्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल इंडिया, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, टी बोर्ड इंडिया, द कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, स्पाइसेस बोर्ड, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अॅपेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, द क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. वैयक्तिकरित्या उपस्थित असलेल्यांव्यतिरिक्त, 100 हून अधिक कंपन्या या परिषदेत आभासी माध्यमातून सहभागी झाल्या.
N.Chitale/S.Chavan/S.Chitnis/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783076)
Visitor Counter : 282