राष्ट्रपती कार्यालय
भारतीय नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला "राष्ट्रपती स्टॅण्डर्ड " सन्मान प्रदान
हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपले नौदल हे सर्वाधिक पसंतीचे सुरक्षा भागीदार आहे- राष्ट्रपती कोविंद
"स्वदेशीकरणाप्रति नौदलाची वचनबद्धता ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आहे,"- राष्ट्रपती
Posted On:
08 DEC 2021 2:35PM by PIB Mumbai
मुंबई, 8 डिसेंबर 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज मुंबईत एका समारंभात भारतीय नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला राष्ट्रपती स्टॅंडर्ड हा सन्मान प्रदान केला. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांनी लष्करी तुकडीला दिलेला सर्वोच्च सन्मान म्हणजे प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड पुरस्कार आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, “राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान प्रदान करणे म्हणजे या तुकडीच्या विद्यमान आणि माजी अधिकारी तसेच नाविकांनी राष्ट्राप्रती केलेल्या अतुलनीय सेवा आणि समर्पणाला दिलेली पावतीच आहे." पन्नास वर्षांपूर्वी 1971 च्या युद्धात पाकिस्तान नौदलाची जहाजे बुडवण्यात 22 व्या क्षेपणास्त्र तुकडीने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी आठवण करून दिली. “खरे तर, प्रामुख्याने देशाच्या किनार्याच्या संरक्षणासाठी आणलेल्या या युद्धनौका आपल्या नौदलासाठी युद्धातील सर्वात शक्तिशाली लढावू ताकद ठरली. ही लढाई आपल्या नौदलाच्या जवानांच्या कुशाग्रतेचे आणि शौर्याचे प्रतीक ठरली आहे" असे कोविंद म्हणाले.

आत्मनिर्भर भारत व्हिजनचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, “नौदलाची ही वचनबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली आहे, ज्यांना अनेक इतिहासकार भारताच्या युद्धासाठी सज्ज नौदलाचे संस्थापक मानतात. 17 वे शतक आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून स्वदेशीकरणाबाबत भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले, 17 व्या शतकात भारतात, युद्धासाठी सज्ज अशा नौदलाची उभारणी करणारे, नौदलाचे संस्थापक, द्रष्टे राजे म्हणून अनेक इतिहासकार ज्यांना मानतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाची वचनबद्धता ही मानवंदनाच आहे."
हिंद-प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या भू-राजकीय आव्हानांचा सामना करण्यात, महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी भारताला मिळाली आहे असे राष्ट्रपती म्हणाले. "बहुतांश जागतिक सागरी व्यापार हिंद महासागर क्षेत्रातून होतो. त्यामुळे या प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे " असे ते म्हणाले. आज, जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाकडे आपले सागरी शेजारी हिंद महासागर प्रदेशातील एक पसंतीचे सुरक्षाविषयक भागीदार म्हणून अपेक्षेने पाहत आहेतअसे कोविंद म्हणाले.
देशात आणि देशाबाहेर मानवतावादी संकटे किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करण्यात भारतीय नौदल आघाडीवर आहे,असे सांगत कोविड-19 च्या संकटात भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात तसेच महाराष्ट्र-गुजरात किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळादरम्यान बचाव कार्यातही भारतीय नौदलाने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान समारंभादरम्यान परिपूर्ण पथसंचलन झाले ज्याची सुरुवात नौदलाच्या सशस्त्र दलाने राष्ट्रपतींना सलामी देऊन केली , त्यानंतर राष्ट्रपती स्टॅण्डर्ड प्रदान करण्यात आले. नौदलाच्या जवानांच्या कवायती आणि मार्कोस आणि नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकाने समारंभाचा समारोप झाला. या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि लष्करातील तसेच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीबाबत
क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीची औपचारिक स्थापना ऑक्टोबर 1991 मध्ये मुंबईत दहा वीर श्रेणी आणि तीन प्रबळ श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांसह करण्यात आली होती. मात्र , 'किलर्स' चा उदय 1969 पासूनचा आहे . भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तेव्हाच्या USSR (युनायटेड सॉव्हरेन सोशालीस्ट रिपब्लिक ) मधून OSA I या श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांचा समावेश करण्यात आला .


04-05 डिसेंबर 1971 च्या रात्री, भारतीय नौदलातील सर्वात तरुण योद्धांनी पाकिस्तानच्या नौदलावर विनाशकारी आक्रमण केले. भारतीय नौदलाची जहाजे निर्घात , निपट आणि वीर यांनी त्यांची स्टाईक्स ही युद्धनौका रोधी क्षेपणास्त्रे डागली आणि पाकिस्तान नौदलाची खैबर आणि मुहाफिझ ही जहाजे बुडवली, ऑपरेशन ट्रायडंट असे सांकेतिक नाव असलेले, हे ऑपरेशन नौदलाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑपरेशन्सपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये भारतीय सैन्याची कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भारतीय नौदलाने दिनांक 8/9 डिसेंबरच्या रात्री आणखी एक धाडसी हल्ला केला, जेव्हा आयएनएस विनाशने दोन फ्रिगेट्सच्या मदतीने चार स्टाईक्स क्षेपणास्त्रे डागली आणि पाकिस्तान नौदल ताफ्याचा टँकर डाका बुडवला तसेच कराची येथील किमारी ऑइल स्टोरेज सुविधेचे मोठे नुकसान केले. अशा जहाजे आणि स्क्वाड्रनमधील जवानांच्या या स्पृहणीय कर्तृत्वामुळेच त्यांना ‘किलर’ ही पदवी मिळाली
राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान सोहळ्याच्या या अविस्मरणीय प्रसंगी, "किलर स्क्वाड्रन "या तुकडीचा भाग असलेले काही ज्येष्ठ अधिकारी सैनिकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांचीही राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींनी प्रशंसा केली.
याप्रसंगी राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणाची लिंक
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1779209)
Visitor Counter : 403