अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते डीआरआयच्या 64 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन

Posted On: 04 DEC 2021 9:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत प्रमुख तस्करी-विरोधी गुप्तचर आणि तपास संस्था डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाचा  64 वा वर्धापन दिन आज नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसेच डीआरआयचे महासंचालक आलोक तिवारी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी याप्रसंगी डीआरआय संस्थेने केलेल्या कामगिरीबद्दल, विशेषतः महामारीच्या काळात केलेल्या प्रशंसनीय कार्याबाबत संस्था आणि तेथे कार्यरत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कोविड काळात, आत्यंतिक धोक्याच्या वातावरणात डीआरआयचे सुमारे 800 अधिकारी करत असलेल्या अथक प्रयत्नांबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्या सर्वांचे कौतुक केले. तसेच महामारीच्या काळात जीव गमावलेल्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता आणि शोकभावना व्यक्त केली.

या संस्थेचे अधिकारी आणि त्यांचे कार्य फारसे सर्वांसमोर येत नसले तरी तेही  पहिल्या फळीतील संरक्षण दलांसमान काम करत, कठीण काळात देशाच्या आर्थिक आघाड्यांचे संरक्षण करण्याचे नेत्रदीपक कार्य ते करत होते, अशा शब्दांत त्यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतूक केले..डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या काळात उघडकीस आणलेले मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थ, सोने, रक्तचंदन, हस्तिदंत, सिगारेट्स, इत्यादींच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, अशा प्रकारच्या कठोर कारवायांतून तस्करीचे असे प्रयत्न मुळातून उखडून टाकले जातील असा स्पष्ट संदेश दिला गेला पाहिजे.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था  आणि गुप्त माहिती गोळा करणाऱ्या संस्था यांच्या दरम्यान उत्तम समन्वय आणि कारवाई करण्याजोग्या माहितीचे आदानप्रदान यांच्या माध्यमातून देशाच्या सर्व आघाड्या अधिक कार्यक्षमतेने सुरक्षित करण्याचा मार्ग  सुनिश्चित होतो असे केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी पुढे सांगितले. त्यांनी डीआरआयमधील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक साधनांचा दुहेरी वापर होण्याला प्रतिबंध करणे तसेच विषारी टाकाऊ पदार्थ आपल्याच देशात टाकले जाण्यापासून रोखणे यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

सोने तस्करी, अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे काही पदार्थ, वन्यजीव इत्यादी तसेच व्यावसायिक घोटाळे आणि आंतरराष्ट्रीय सक्तवसुली कारवाया आणि सहकार्य यासारख्या विषयांतील संघटीत स्वरूपाच्या पद्धतींचे विश्लेषण करणारा भारतातील तस्करी अहवाल 2020-21 देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जारी केला.

या प्रसंगी, 1963 च्या तत्कालीन भारतीय महसूल सेवा तुकडीतील अधिकारी बी.के.अगरवाल यांना संस्थेसाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय आणि कटिबद्ध सेवेबद्दल डीआरआय उत्कृष्ट सेवा सन्मान,2021’ देऊन गौरविण्यात आले.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778130) Visitor Counter : 253


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu