आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी भूषवले जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद


राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एआरटी सेवा आणि प्री एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस विषयक महत्त्वाचे मार्गदर्शक नियम जारी

जनस्वास्थ्य निश्चितीसाठी, आपली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता आपले प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने एका ठिकाणी केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे आहे- डॉ. भारती प्रवीण पवार

Posted On: 01 DEC 2021 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जागतिक एड्स दिन 2021च्या असमानतांचा अंत करा, एड्सचा अंत करा, महामारीचा अंत करा, या संकल्पनेच्या अनुषंगाने बोलताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी स्त्री-पुरुष भेदभावाच्या समस्येची हाताळणी करण्यावर आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यावर, जास्त जोखीम असलेल्या गटांविरोधातील भेदभाव दूर करण्यावर, दाद मागण्यामधील असमानता, उत्पन्नातील तफावत दूर करण्यावर आणि बाधित आणि प्रभावित लोकसंख्येला सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

जनस्वास्थ्य निश्चितीसाठी, आपले प्रयत्न नियोजनबद्ध पद्धतीने एका ठिकाणी केंद्रित करून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये निर्धारित केल्यानुसार कोणालाही मागे राहू न देता  आपली उद्दिष्टे साध्य करणे  अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

एचआयव्ही एड्सच्या इतिहासाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, भारतामध्ये एचआयव्हीचा सर्वात पहिला रुग्ण 1986 साली तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये आढळला याची तुम्हाला माहिती आहेच. त्याच वर्षी भारत सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय एड्स समितीची स्थापना केली. त्यानंतर 1992 मध्ये सरकारने एचआयव्ही आणि एड्सशी संबंधित धोरणांवर देखरेख ठेवण्यासाठी, प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची(NACP) अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेची(NACO) स्थापना केली. तेव्हापासून भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम एचआयव्ही/एड्स चा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी एक समावेशक कार्यक्रम म्हणून राबवला जात आहे. हा कार्यक्रम अतिशय उल्लेखनीय आहे आणि या कार्यक्रमाने जागतिक पातळीवर यश मिळवले आहे. मित्रांनो, मला हे सांगायला अतिशय अभिमान वाटत आहे की NACP-IV च्या काळात सुमारे 20 पेक्षा जास्त देशांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी NACO ला आणि तिच्या प्रकल्पांना आमचा कार्यक्रम शिकण्यासाठी भेट दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. भारती प्रवीण पवार यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला आणि रेड रिबन क्लब्जच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या भागातील संस्था आणि भागांमध्ये त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत चर्चा केली. एचआयव्ही- एड्स बाबत जागरुकता निर्माण करण्यामध्ये युवा वर्गाची भागीदारी महत्त्वाची ठरेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

यावेळी राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एआरटी सेवा आणि प्री एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस विषयक महत्त्वाचे मार्गदर्शक नियम देखील प्रसिद्ध केले .

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777041) Visitor Counter : 648


Read this release in: English , Urdu , Hindi