माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

52 व्या इफ्फी समारोप समारंभामध्ये सहाव्या ब्रिक्स चित्रपट महोत्सव पुरस्कारांची घोषणा


दक्षिण आफ्रिकेचा चित्रपट ‘बरकत’ आणि रशियन चित्रपट ‘द सन अबाव्ह मी नेव्हर सेटस्’ हे चित्रपट ठरले सर्वोकृष्ट

ब्राझीलच्या चित्रपट निर्मात्या ल्युसिया मुरात यांच्या ‘अॅना’ला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार

भारतीय अभिनेता धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, धनुषने ‘असुरन’ मध्ये केलेल्या रांगड्या शेतक-याच्या भूमिकेसाठी पुरस्कार

ब्राझिलच्या अभिनेत्री लारा बोल्डोरिनी हिला ऑन व्हील्स’मधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

चीनचे दिग्दर्शक यान हान यांना ‘ए लिटिल रेड फ्लॉवर’ साठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार

पणजी, 28 नोव्‍हेंबर 2021 

 

सहाव्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक एमी जेफ्ता यांचा दक्षिण आफ्रिकन चित्रपट बरकत आणि दिग्दर्शक ल्युबोव बोरिसोवा यांचा  द सन अबोव्ह मी नेव्हर सेट्स या रशियन चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार विभागून देण्यात आला  आहे. 20-28 नोव्हेंबर 2021 दरम्यान गोव्यात 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत प्रथमच ब्रिक्स  चित्रपट महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता.

मानवी भावनांचे उत्तम चित्रण आणि पडद्यावर उत्कृष्ट रित्या कथा सांगितल्याबद्दल या चित्रपटांना हा पुरस्कार देण्यात आला.

चित्रपटांच्या उत्कृष्टतेबद्दल आणि गुणवत्तेबाबत बोलताना , ब्रिक्स ज्युरीचे अध्यक्ष राहुल रवैल म्हणाले, “या वर्षीच्या ज्युरीमध्ये काही अतिशय सक्षम लोक होते आणि या प्रक्रियेदरम्यान आम्हाला  जाणवले ते म्हणजे जरी आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीचे असलो तरी, जेव्हा आम्ही चित्रपट पाहतो तेव्हा आम्ही सर्व एक समान असतो. आणि  हे जग असेच असायला हवे. ”

सर्वोत्कृष्ट चित्रपट, बरकत, 2022 च्या 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी  पाठवलेला दक्षिण आफ्रिकेचा अधिकृत चित्रपट आहे.  हा मातृसत्ताक व्यवस्थेतील एका वृद्ध मातेविषयीचा   एक नाट्यमय विनोदी चित्रपट आहे,जिचे  उद्दिष्ट ईदच्या सणानिमित्त  तिच्या विस्कळीत कुटुंबाला एकत्र आणून तिच्या नवीन प्रेमासंबंधी सगळयांना सांगायचे आहे.  या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

दुसरा  सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट ‘द सन अबोव्ह मी नेव्हर सेट्स’ यात एका तरुणाची कथा सांगितली आहे , जो वृद्ध माणसामध्ये जीवन जगण्याची उर्मी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतो , जेणेकरून ते आपल्या हरवलेल्या मुलीला पाहू शकतील.  विनोदी नाट्य असलेला हा चित्रपट ल्युबोव्ह बोरिसोवा यांनी दिग्दर्शित केला असून  रशियन  कथाप्रकारातील  एक प्रेरणादायी प्रयत्न आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ब्राझीलच्या चित्रपट निर्मात्या ल्युसिया मुरात यांना त्यांच्या ‘अॅना’ या माहितीपटासाठी मिळाला. रिओ दि जानेरो येथे जन्मलेल्या मुरात यांच्या कलाकृतीमुळे  ब्राझीलच्या  सिने जगतामध्ये एक नवा अध्याय सुरू झाला असे, म्हणावे लागेल, इतका दमदार प्रवेश ल्युसिया यांचा झाला. त्यांच्या ‘अॅना’ चित्रपटामध्ये महिला अतिशय कणखर आणि शूर आहेत. त्या अतिशय अवघड परिस्थितीत आपला लढा देत आहेत आणि समाजामध्ये आखून दिलेल्या विशिष्ट रेषेच्या पल्याड जावून या महिला आपली ओळख शोधत आहेत.

भारतीय अभिनेता धनुष याला त्याच्या ‘असुरन’मधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटामध्ये धनुष याने शेतकरी पिता-पुत्र अशी दुहेरी भूमिका केली आहे. समाजातल्या जुन्या सरंजामशाही व्यवस्थेच्या विरोधात हा रांगडा  शेतकरी उभा ठाकतो. या शेतक-याच्या भूमिकेत धनुष याने भावनिक प्रसंग मोठ्या ताकदीने उभे केले आहेत. त्याच्या या चित्रपटाचे आणि त्याने वठवलेल्या रांगड्या शेतक-याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आहे.

ब्राझिलच्या अभिनेत्री लारा बोल्डोरिनी यांना त्यांच्या ‘ऑन व्हील्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे. वडिलांच्या शोधाची ही एक रोमांचक कथा आहे. या प्रवासात येणा-या अनुभवांचे हे चित्रीकरण आहे.

याशिवाय चीनचे दिग्दर्शक यान हान यांना त्यांच्या ‘ए लिटिल रेड फ्लॉवर फ्रॉम चायना’ या चित्रपटाला परीक्षकांचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मृत्यू सामोरा असताना प्रेम आणि दयाळूपणा निवडणा-या एका सामान्य व्यक्तीची वास्तववादी हळूवार प्रेमकथा या चित्रपटामध्ये पहायला मिळते.

याप्रसंगी राहुल रवैल म्हणाले, ‘‘ ज्यावेळी आम्ही पुरस्कार विजेत्यांचा निर्णय घेण्यासाठी आलो, त्यावेळी सर्व परीक्षक सदस्य एकाच विशिष्ट पानावर, बिंदूवर येवून थांबले होते. हीच तर चित्रपटाची खरी ताकद आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ब्रिक्स देश म्हणजे जगातील एक शक्ती बनविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे, अशी आपली इच्छा आहे.’’ 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी तसेच खासदार सुमालता आणि राहुल रवैल यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यंदाच्या वर्षी इफ्फीने पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्था  असलेल्या ब्रिक्स सदस्य देशांना एकत्र आणले आहे, जे जगातल्या आघाडीच्या चित्रपट निर्मिती करणा-या देशांपैकी आहेत . या स्पर्धात्मक महोत्सवाच्या परीक्षक मंडळामध्ये प्रत्येक ब्रिक्स देशातून एक याप्रमाणे  पाच सदस्यांचा समावेश होता. 52व्या इफ्फी मध्ये सहाव्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झालेल्या वीस चित्रपटांचे परीक्षण करून परीक्षकांनी पाच श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर केले .

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1775955) Visitor Counter : 276


Read this release in: Bengali , English , Urdu , Hindi