माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विस्मृतीत गेलेल्या टोकियोमधील युद्धग्रस्त भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देणारा जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग’, 52 व्या इफ्फीमध्ये ठरला सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी


निराशेच्या जीवघेण्या थंडीत आशेचा दीप लावण्याची प्रेरणा देणाऱ्या, झेकोस्लावियाचा दिग्दर्शक व्हॅक्लाव्ह कद्रन्का यांच्या 'सेव्हिंग वन हू इज डेड' चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार

मराठी चित्रपट ‘गोदावरी’ ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार; निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार

दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेराच्या 'द फर्स्ट फॉलन' मधील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कार्व्हालोला आणि निखिल महाजनच्या 'गोदावरी' चित्रपटाला विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार, संयुक्तरित्या जाहीर

आपल्या अभिनयाने, सर्व ज्यूरी सदस्यांना खिळवून ठेवणाऱ्या स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना हिला शार्लोटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार

1984 या वर्षीच्या रशियातील गुंतागुंतीच्या घडामोडी आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी रशियन दिग्दर्शक रोमन वास्यानोव्हच्या 'द डॉर्म' ला, स्पेशल मेन्शन म्हणजेच’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त.

दिग्दर्शक मारी अलेसेंद्रिनीचा ‘झाहोरी’ हा धर्म आणि वसाहतवादावर प्रकाश टाकणारा आणि पॅटागोनियाच्या मूळ स्थानिक लोकांना अत्यंत उमदेपणे सन्मान देणाऱ्या चित्रपटाची, 52 व्या इफ्फीमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

स्पॅनिश चित्रपट 'द वेल्थ ऑफ द वर्ल्ड' द्वारे पदार्पण करणारे दिग्दर्शक सायमन फॅरिओल यांना पदार्पणातील स्पर्धा गटात विशेष उल्लेखनीय चित्रपट सन्मान

Posted On: 28 NOV 2021 6:15PM by PIB Mumbai

पणजी, 28 नोव्‍हेंबर 2021 

 

गोव्याची राजधानी पणजी इथे गेले नऊ दिवस चाललेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची आज रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी  आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध  गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

‘रिंग वॉन्डरींग’ हा चित्रपट फॅंटसी म्हणजेच कल्पनाविलास आणि मांगा या जपानी कॉमिक्स-प्रेरित वास्तवतेचा अत्यंत सुरेख मेळ आहे”

जपानमधील एक कामगार आणि मांगा या जपानी कॉमिक्स कलेचा हौशी कलाकार, एकदिवस काही हाडांचा शोध सुरु करतो, त्याची कलाकृति पूर्ण करण्यासाठी, या हाडांची त्याला गरज असते. मात्र, दिवसअखेर त्याचा शोध संपतो त्यावेळी, त्याच्या हातात युद्धग्रस्त जपानमधील स्मृति लागतात. युद्धाच्या या स्मृति देशाच्या सामाजिक सदसद्विवेकाने आणि सामाईक इतिहासाच्या पडद्याआड लपून गेल्या असतात. जपानी  दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या ‘रिंग वॉन्डरींग’ या चित्रपटाची यंदाच्या 52 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच, भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, सूवर्ण मयूर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युद्धग्रस्त काळानंतर  विस्मृतीत गेलेल्या भूतकाळात दडलेल्या हजारो आत्म्यांना समर्पित असा हा चित्रपट आहे.

या चित्रपटाचे कौतुक करताना, महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटाच्या ज्युरीने 2021 च्या ‘रिंग वॉन्डरींग’  या चित्रपटाचे वर्णन, ‘कल्पनारम्य आणि मांगा -प्रेरित वास्तवाचा सुंदर संयोग  असे केले आहे”. हा चित्रपट आजच्या जपानी समाजात प्रतिध्वनीत होत असलेल्या, भूतकाळाचे प्रतिबिंब आहे. या गुंतागुंतीच्या, बहुआयामी आणि देशासाठी वेदनादायक आघातांचे कथन या चित्रपटात अत्यंत संयतपणे करण्यात आले आहे, असे निरीक्षण ज्यूरी सदस्यांनी नोंदवले. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हीच्या दर्जेदार हाताळणी मुळे हा चित्रपट एक समाधानकारक अनुभव देणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या चित्रपटात, युद्धाच्या काळातील आठवणी जिवंत करण्याचा प्रयत्न केला असला तरी हा चित्रपट युद्धपट नाही; त्याऐवजी, तो मानवी नातेसंबंधांवर केंद्रित आहे. सहज समजणाऱ्या गोष्टींपलीकडच्या सूक्ष्म जाणिवा जागृत करण्याचे काम हा चित्रपट करतो.

इफ्फीमध्ये रजत मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला झेक दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांचा चित्रपट - ‘सेव्हिंग वन हू इज डेड’

आयुष्यात आपण ज्यावेळी सर्वात कठीण परिस्थितीतून आणि आव्हानात्मक काळातून जात असतो, त्यावेळीही  आपण आशा कधीच सोडू नये आणि आपण मुक्तीची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे, असे संदेश देणारा हा चित्रपट आहे. निराशेच्या थंडीमध्ये आशेची मेणबत्ती पेटवणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शकाचे वडील कोमामध्ये गेल्यानंतर ते वाचण्याची शक्यता आता नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले असतानाही दिग्दर्शक आणि त्यांच्या आईने अत्यंत कुशलतेने आणि आत्मविश्वासाने जे प्रयत्न केले, त्याची ही कथा आहे.

या चित्रपटाचे परीक्षकांनी खूप कौतुक केले आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केलेली धडपड अनेक अडथळे पार करीत यशस्वी होते. एका संधीप्रकाशात अडकलेल्या आईची आणि तिच्या मुलाची ही कथा जीवन आणि मृत्यूच्या कल्पनांना जोडणारी आहे. पोर्टेट शैलीतल्या या चित्रपटाविषयी अधिक माहिती येथे वाचावी........

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/5-1RFPN.jpg

वाक्लॅव काद्रंका

‘कद्रन्का’ चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. 

मराठी चित्रपट गोदावरी ठरला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी  

मराठी चित्रपट अभिनेते जीतेंद्र भिकूलाल जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जीतेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये  दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबरोबरच निखील महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे  ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो.

‘गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे”

अभिनेते जीतेंद्र जोशी

मराठी अभिनेते जीतेंद्र जोशी यांनी निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये निशिकांत कामत या पात्राची गुंतागुंतीची भूमिका ज्या कौशल्याने साकारली आहे त्याविषयी आतरराष्ट्रीय परीक्षकांनी असे मत नोंदवले आहे की, त्रस्त झालेल्या निशिकांतचे  आणि त्याच्‍या लालबुंद डोळ्यांचे चित्रण एकाचवेळी अतिशय प्रभावी आणि शोकपूर्ण केले आहे. चित्रपटात हे पात्र एकूणच अतिशय गुंतागुंतीचे असतानाही  कलाकाराने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या रागातून वाहणारे अश्रू परिणामकारक ठरतात, असे कौतुक परीक्षकांनी केले आहे.

जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि  10 लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/6-2M877.jpeg

निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट एका माणसाची त्याच्या गोदावरीशी असलेल्या नात्याने दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यातून  पुरातन परंपरा आणि संस्कृती जपण्याची तात्विक आस दर्शवितो. या नदीचे 2020 मधील रूप दाखवून तिची भक्ती करणाऱ्यांचे वंशज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे परीक्षकांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. “गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे आणि बदलत्या काळात नद्या कशा प्रकारे विद्रूप होतात हे दाखविणारा एक मार्ग आहे” या पवित्र नदीमधील अतिप्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे तिचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे हे दाखविताना  चित्रपटातील नायक संताप आणि अंतर्गत वादळाचा अनुभव घेतो, या चित्रपटातील प्रमुख पात्राचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांच्या माध्यमातून त्याची मनस्थिती अत्यंत समर्थपणे मंडळी आहे असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

1980 च्या दशकात ब्राझीलमध्ये लैंगिक अल्पसंख्याकांनी भोगलेल्या दुःख आणि भेदभावाच्या आतापर्यंत समोर न आलेल्या  कथा मांडण्याचा  दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा यांचा  उत्कट आणि धाडसी प्रयत्न म्हणजे 'द फर्स्ट फॉलन'.   चित्रपट हे जसे भूतकाळाचे एक चित्र आहे  तसेच वर्तमानाचेही  आहे. ब्राझिलियन अभिनेत्री आणि सहाय्यक दिग्दर्शिकेला  तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.  परीक्षकांच्या मते,तिचे या चित्रपटासाठीचे योगदान अभिनयापेक्षा अधिक आहे.  समाजातील परिस्थिती आणि काळाची गुंतागुंत अतिशय प्रामाणिकपणे साकारल्याबद्दल परीक्षक तिचे  तिचे कौतुक करतात. येथे अधिक वाचा.

स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना यांना त्यांच्या शार्लोट हे पात्र रंगवताना सहानुभूती आणि नैराश्य सारख्याच प्रमाणात दर्शविणारे आकर्षक सादरीकरण केल्याबद्दल  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/6-35MQ1.jpg

52 व्या इफ्फी मध्ये स्पॅनिश चित्रपट सृष्टीतील प्रख्यात कलाकार अँजेला मोलिना यांना सुवर्ण मयूर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिग्दर्शक सिमॉन फ्रँको यांच्या शार्लोट या समानतादर्शक चित्रपटातील प्रमुख भूमिकेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या चित्रपटात मोलिना यांनी स्वप्नांतील भविष्यकाळ घडविण्यापायी भूतकाळाची वर्तमानकाळाशी सरमिसळ करण्यासाठी आयुष्य बदलून टाकणाऱ्या स्वप्नाळू प्रवासाला स्वीकारणाऱ्या गतकाळातील अभिनेत्रीची अत्यंत वास्तव भूमिका वठविली आहे.

अँजेला मोलिना यांनी साकारलेली भूमिका वयोवृद्ध प्रख्यात अभिनेत्रीची आहे जी परिस्थिती हाताळण्यात कुशल आहे आणि मनातून असुरक्षित देखील आहे असे निरीक्षण या भूमिकेबद्दल बोलताना परीक्षकांनी नोंदविले. “हे पात्र रंगवताना त्यांनी सहानुभूती आणि नैराश्य सारख्याच प्रमाणात दर्शविणारे आकर्षक सादरीकरण केले आहे आणि कॅमेऱ्यासमोरचा त्यांचा वावर अत्यंत मनमोहक असून त्याने सर्व परीक्षकांना संमोहित केले.”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मोलिनाला सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी प्रदान करण्यात आले.

1984 च्या युएसएसआरच्या (सोविएट रशियाच्या) गुंतागुंतीच्या आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार ‘द डॉर्मला' प्रदान करण्यात आला.

व्यवस्था आणि विद्यार्थी वसतिगृह चालवणाऱ्या व्यक्ती भ्रष्ट  असूनही सन्मानाचे  जीवन जगू इच्छिणाऱ्या मित्रांच्या गटाला झालेला त्रास  दिग्दर्शक रोमन व्हेजिएनोव  यांचा  रशियन चित्रपट 'द डॉर्म' (The DORM / Obschaga) हा चित्रपट दर्शवतो. या चित्रपटाला  आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटाच्या परीक्षकांचा  विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.  1984 च्या तत्कालीन रशियामधील एका  विद्यापीठाच्या संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या काही तरुणांच्या नजरेतून क्लिष्ट आणि भ्रष्ट समाजाचे चित्रण उत्तम प्रकारे केलेले असल्याचे परीक्षकांचे मत आहे.

पदार्पणातील सर्वोत्तम  चित्रपट/ अर्जेंटिना: जहोरी

झहोरी ही एका निडर तरुण मुलीची कथा आहे जी तिचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाळा आणि पालकांविरुद्ध बंड करते.  दिग्दर्शक  मारी अलेझाड्रिनी यांना  या चित्रपटासाठी  इफ्फी 52 मध्ये   पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट गटातला  पुरस्कार मिळाला .  जहोरी  हे  घोड्याचे नाव असून जंगलात जाण्याची  आणि मुक्त होण्याची इच्छा आहे.  या सुंदर छायाचित्रित चित्रपटात एका बंडखोर मुलाची भावना व्यक्त केली आहे. गंभीर पण कधी कधी विनोदी आणि मार्मिक असा हा चित्रपट  धर्म आणि वसाहतवादावर टीका करतो  आणि मूळ  स्थानिक लोकांप्रति  आदर व्यक्त करतो, असे परीक्षकांनी म्हटले आहे.

पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट : वेल्थ ऑफ द वर्ल्ड/ चिली- “युद्धाची निरर्थकता अत्यंत वास्तव स्वरुपात दर्शविणारा ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’ पाहणे हा अत्यंत थक्क करणारा अनुभव आहे”

सैनिकी शिक्षण घेतलेला शेतकरी आणि त्याचा सहकारी सैनिक यांची चिलीच्या स्वातंत्र्य युद्धाच्या आघाडीवारीन घरी येण्याबद्दलची 1814 मध्ये घडलेली कथा सांगणाऱ्या या चित्रपटाने परीक्षकांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळविली आहे. ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’/ ला रिक्वेझा देल मुंडो या दिग्दर्शक आणि अभिनेत्री सिमॉन फरिओल यांच्या ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’/ ला रिक्वेझा देल मुंडो या पहिल्याच स्पॅनिश चित्रपटाला परीक्षकांकडून पदार्पणातील चित्रपटासाठीचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात युद्धाची निरर्थकता दाली-प्रेरित पद्धतीने अत्यंत वास्तव स्वरुपात दर्शविणारे चित्रण केले आहे अशी टिप्पणी परीक्षकांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, ला रिक्वेझा देल मुंडो हा दिग्दर्शिकेचा पहिलाच चित्रपट थक्क करणारा अनुभव देतो

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील परीक्षक मंडळ अध्यक्ष आणि इराणी चित्रपट निर्माते रखशान बानीएटमाद म्हणाले की विविध देशांतून आलेल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे परीक्षण करणे हा अत्यंत विस्मयकारक अनुभव होता. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मुळापासून हलवून सोडण्याचे आणि त्यांच्या हृदयाला इतक्या खोलवर स्पर्श करण्याचे सामर्थ्य असते? चित्रपट प्रेक्षकांना आश्चर्यकारक अनुभव देतो? आपल्या सामायिक मानवी परिस्थितीच्या संकल्पना किंवा नवी परिमाणे खुली करते का?  चित्रपटाच्या विषयाला विचारात न घेता माध्यम आणि कलात्मक प्रतिभा या साधनांचा परिणामकारक पद्धतीने वापर करून चित्रपटाची कथा प्रभावीपणे मांडता येते का? अशा काही उत्कृष्टतेच्या परिमाणांचा कस लावून परीक्षक मंडळातील ख्यातनाम परीक्षकांनी आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्राच्या उत्कृष्ट चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे अशी माहिती कोलंबियाचे चित्रपट दिग्दर्शक आणि परीक्षक मंडळाचे सदस्य सीरो ग्वेरा यांनी दिली. 

परीक्षक मंडळाचे अध्यक्ष बानीएटमाद यांच्यासह परीक्षक मंडळाच्या सदस्यांमध्ये ब्रिटीश चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टीफन वूल, कोलंबियाचे चित्रपट निर्माते सीरो ग्वेरा, श्रीलंकेचे चित्रपट निर्माते विमुक्ती जयसुंदरा आणि भारतीय तसेच ओडीयन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक नीला मधाब पांडा यांचा समावेश होता.

 

* * *

JPS/Radhika/Uma/Shailesh/Sanjana/Sonali/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1775889) Visitor Counter : 320


Read this release in: Tamil , English , Hindi , Malayalam