वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत दुपटीने वाढून 23.62 अब्ज डॉलर्सवर गेली : पीयूष गोयल
भारत जगातील सर्वात मोठे रत्नांचे व्यापार केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते- पीयूष गोयल
गोयल यांनी भारताच्या रत्ने आणि दागिने उद्योगाला जगातील एक अग्रणी उद्योग बनवण्यासाठी चार मुद्दे मांडले
सुरत हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून जगातले दागिन्यांचे निर्मिती केंद्र बनण्याची त्यात क्षमता आहे: पीयूष गोयल
Posted On:
27 NOV 2021 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र म्हणून उदयाला येऊ शकतो.
सुरतच्या दागिने निर्मिती संघटनेने (SJMA) आयोजित केलेल्या जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग शो - 2021 च्या उद्घाटन समारंभात दिलेल्या व्हिडिओ संदेशात गोयल म्हणाले की, सरकारने निर्यात प्रोत्साहनासाठी रत्ने
आणि दागिने क्षेत्राची निवड केली आहे .
"आपण हिऱ्याला पैलू पाडण्यात आणि पॉलिशिंगमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, आपण सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार केंद्र बनू शकतो," असे ते म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यांत ऑक्टोबर 21 पर्यंत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 23.62 अब्ज डॉलर्स होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 11.69 अब्ज डॉलर्स (+102.09%) होती.
"आपल्या उत्पादकांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आपण दुबई-यूएई, अमेरिका , रशिया, सिंगापूर, हाँगकाँग आणि लॅटिन अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये विस्तार करू शकलो ," असे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, सरकारने या क्षेत्राच्या वाढीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुधारित सुवर्ण मुद्रीकरण योजना, सोन्याच्या आयात शुल्कात कपात आणि अनिवार्य हॉलमार्किंग यांसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत.
"आपल्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट कारागीर आहेत , त्यांची सर्जनशीलता मजबूत करणे आणि कारागिरांच्या नियोजनबद्ध कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले, "नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार आणि विद्यमान बाजारपेठांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आपण दर्जेदार उत्पादने बनवायला हवीत .” असेही गोयल यांनी सांगितले.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775677)