माहिती आणि प्रसारण मंत्रालय
94 वा व्या ऑस्कर (अकादमी) पुरस्कारात भारताकडून अधिकृतरित्या पाठवला गेलेला ‘कूळंगल’ चित्रपट,कौटुंबिक अत्याचारांवर बोट ठेवतो
अत्यंत साधे कथानक सोप्या पद्धतीने सांगितले गेल्याने, ते प्रेक्षकांच्या काळजाला भिडते: विनोदराज पी. एस. यांचे 52 व्या इफफीमध्ये प्रतिपादन
पणजी, 27 नोव्हेंबर 2021
भारताकडून यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठीचा अधिकृत नामांकित चित्रपट, ‘‘कूळंगल’’ वैवाहिक आयुष्यानंतर पत्नी आणि मुलाला सहन कराव्या लागणाऱ्या कौटुंबिक अत्याचारावर भाष्य करतो.
“माझी बहीण आणि तिच्या लहानग्या मुलाला, तिच्या व्यसनाधीन नवऱ्याकडून सहन कराव्या लागणाऱ्या छळवणुकीवर हा चित्रपट आधारलेला आहे.” अशी माहिती, या तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शक, विनोदराज पी. एस. यांनी दिली. गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफफीदरम्यान, झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्या या पहिल्याच चित्रपटाबद्दल आणखी माहिती देतांना ते म्हणाले, की ‘‘कूळंगल’’(म्हणजे खडे) हा चित्रपट, एक दारूच्या आहारी गेलेला बाप आणि त्याचे लहान मुल यांच्यातील संबंधांवर आधारित आहे.पत्नी, पतीच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून घरातून माहेरी निघून गेली असते, मात्र, त्यानंतर बाप, लेकाला घेऊन पत्नीला परत घरी आणायला जातो. हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
“मी माझ्या गावातच, या चित्रपटाचे चित्रीकरण केले.कारण, ही कथा आणि आजूबाजूचा परिसर माझ्या मनाच्या जवळ आहेत. या चित्रपटात बाप-लेक या दोन व्यक्तिरेखांसोबतच हा रुक्ष गवताळ प्रदेश तिसरी व्यक्तिरेखा म्हणूनच दिसतो. कारण अनेकदा मानवी वर्तणूकीवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि भौगोलिक प्रदेशांचा परिणाम होत असतो.
हा कोरडाठाक, रुक्ष प्रदेश आणि घाम काढणारे ऊन, या पार्श्वभूमीवर संपूर्ण चित्रीकरण झाले आहे. या व्यक्तिरेखांच्या जडणघडणीत, या वातावरणाचा मोठाच परिणाम जाणवतो.” असे विनोद राज यांनी यावेळी सांगितले.
या चित्रपटात मुलाची भूमिका केलेला बालकलाकार, चेल्लापंडी, देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाविषयीचे अनुभव त्याने यावेळी सांगितले.
आयसीएफटी- यूनेस्को गांधी पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत देखील हा चित्रपट असून इतर अनेक चित्रपट महोत्सवात त्याचे शो झाले आहेत. जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांनी नावाजलेला हा चित्रपट आता ऑस्करसाठी गेला आहे.
‘कूळंगल’
(भारतीय पॅनोरामा चित्रपट विभाग- तामिळ)
दिग्दर्शकाविषयी :
विनोदराज पी. एस. यांनी आपल्या चित्रपट करकीर्दीची सुरुवात, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते –दिग्दर्शक एन. राघवन यांचे सहाय्यक म्हणून केली तसेच ‘मनल मागुडी’ या नाट्यसंस्थेसोबतही त्यांनी काम केले. ‘कूळंगल’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.
निर्माते : राऊडी पिक्चर्स ही, विघ्नेश शिवन ( उर्फ विघ्नेश्वर एस.) या पटकथा लेखक-दिग्दर्शक यांनी स्थापन केलेली संस्था आहे. ‘‘कूळंगल’’(दगड) हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सोबत त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
कलाकार आणि तंत्रज्ञ :
पटकथा : विनोदराज पी. एस, प्रसिद्धीविभाग : विघ्ने कुमुलाई , जया पार्थि, संकलन::गणेश शिवा कलाकार : कारुथथादाइयान, चेल्लापंडी
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775671)
Visitor Counter : 276