उपराष्ट्रपती कार्यालय
इमारतींच्या अंतर्भागात अधिक उत्तम वायुवीजन आणि सूर्यप्रकाश खेळावा यासाठी स्थापत्यशास्त्राचा पुनर्विचार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
‘आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असलेली हवा देखील आपले आरोग्य आणि स्वास्थ्य ठरविते याचे स्मरण कोविडने आपल्याला करून दिले’: उपराष्ट्रपती
‘घसरत चाललेला हवेचा दर्जा चिंतेत टाकणारा आहे ; ‘शाश्वततेच्या दृष्टीकोनातून विकासाचे पुनर्मुल्यमापन होणे गरजेचे’- उपराष्ट्रपती
ग्रामीण भागात आधुनिक चिकित्सा आणि आरोग्य सुविधा उभारण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर
उपराष्ट्रपतींनी आभासी पद्धतीने ब्राँकस 2021 या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपी पल्मनॉलॉजी या विषयावरील दुसऱ्या वार्षिक परिषदेचे केले उद्घाटन
Posted On:
27 NOV 2021 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज इमारतींच्या अंतर्भागात अधिक उत्तम वायुविजन आणि सूर्यप्रकाश खेळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी घरांचे नियोजन आणि बांधकाम यासंबंधीच्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असलेली हवा देखील आपले आरोग्य आणि स्वास्थ्य ठरविते याचे स्मरण कोविड महामारीने आपल्याला करून दिले आहे.
यासाठी, विषाणु अनेक तासांपर्यंत हवेत तरंगत रहात असल्यामुळे सामान्य श्वसनक्रिया आणि बोलणे यामुळे देखील हवेवाटे विषाणुसंसर्ग होतो हे सिध्द करणाऱ्या संशोधन अभ्यासाचा उपराष्ट्रपतींनी संदर्भ दिला. गर्दी होऊ शकणाऱ्या जागांमधील अपुरे वायुविजन तेथील स्थिर हवेमध्ये असणाऱ्या व्यक्तींना मोढ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका निर्माण करते अशी टिप्पणी त्यांनी केली.
या संदर्भात त्यांनी पुरेसे वायुवीजन आणि नैसर्गिक प्रकाश असणाऱ्या राहण्याच्या आणि काम करण्याच्या ठिकाणांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आणि हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचे आवाहन वैद्यकीय समुदायाला केले.
उपराष्ट्रपती निवासातून आभासी पद्धतीने ब्राँकस 2021 या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपी पल्मनॉलॉजी या विषयावरील दुसऱ्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करताना नायडू यांनी महामारीनंतर लोक श्वसन\विषयक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत असे निरीक्षण नोंदविले. तंबाखूच्या सेवनामुळे होत असलेल्या फुफ्फुस आणि घशाच्या कर्करोगाबाबत माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार आणि नागरी संस्था अशा दोघांनीही प्रभावी काम करायला हवे असे ते म्हणाले.
देशातील मुख्य शहरांमध्ये खासकरून थंडीच्या महिन्यांमध्ये घसरत चाललेल्या हवेच्या दर्जाबाबत नायडू यांनी चिंता केली. हवामान बदल आणि वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण या दोन घटकांना यासाठीचे मुख्य सहभागी घटक आहेत याकडे निर्देश करत शाश्वततेच्या दृष्टीकोनातून विचार करत विकासाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाचा गंभीरपणे पुनर्विचार होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. प्रत्येकाने आपापल्या जीवनशैलीचे मूल्यमापन करून शक्य तितक्या पातळीपर्यंत कार्बन पदचिन्हे कमी करण्याचा प्रयत्न करायचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
पल्मनॉलॉजीच्या क्षेत्रातील रोबोटिक्स आणि कॉनफोकल मायक्रोस्कोपी तंत्रज्ञानासारख्या आधुनिक शोधांचा उल्लेख करत नायडू म्हणाले की भारतात अनेक आधुनिक रोग चिकित्सा आणि उपचार प्रक्रिया प्रचलित आहेत आणि भारत हा जगातील सर्वात लोकप्रिय आरोग्य पर्यटनाचे ठिकाण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उभारण्याच्या गरजेवर देखील उपराष्ट्रपतींनी भर दिला आणि यासंदर्भात खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्याच्या ग्रामीण भागातील सुविधा केंद्रांमध्ये सटेलाईट केंद्रे उभारून सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. “भारतातील गावांमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य’सुविधा पुरविण्यासाठी देशाच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील पारंपरिक क्षमतांचा पुरेपूर वापर व्हायला हवा,” ते म्हणाले. सामान्य माणसाचा आरोग्यासंदर्भात होणारा खर्च कमी करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना परवडणारी आणि मिळू शकणारी आरोग्यसेवा निर्माण करण्याची विनंती त्यांनी आरोग्य सुविधा उद्योगांतील सर्व भागधारकांन केली.
देशभर वेगाने सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमुळे भारत लवकरच महामारीने निर्माण केलेल्या आव्हानांवर मात करेल असा विश्वास व्यक्त करत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन संघभावनेने काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
श्वसनविषयक आजारांसह भारतात निर्माण होऊ पाहणारे असंसर्गजन्य आजारांचे आव्हान लक्षात घेऊन उपराष्ट्रपतींनी युवकांना आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवन’ शैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
“हालचाल न करण्याच्या सवयी, आरोग्य बिघडविणारे अन्न टाळा आणि योगा किंवा सायकलिंग सारखा शारीरिक व्यायाम नियमितपणे करा”, असे ते म्हणाले.
ब्राँकस 2021 परिषदेचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सह व्यवस्थापक डॉ.हरी किशन गोनुगुन्तला, ब्राँकॉलॉजी आणि हस्तक्षेपी पल्मनॉलॉजी विषयक युरोपियन संघटनेचे अध्यक्ष प्र.मोहमद मुनव्वर, यशोदा रुग्णालय गटाचे संचालक डॉ.पवन गोरुकंटी, अनेक डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक आणि इतरांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775568)
Visitor Counter : 228