माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आव्हानात्मक काळातही मुक्तीची ठिणगी पेटती ठेवण्याची आवश्यकता - 52 व्या इफ्फीमध्ये दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांचे मनोगत
‘सेव्हिंग वन हू वॉज डेड’ - आशेचा प्रकाश किरण दाखवणारा चित्रपट
पणजी, 26 नोव्हेंबर 2021
आयुष्यात सर्वात कठीण परिस्थितीतून आणि आव्हानात्मक काळातून जात असतानाही आपण आशा सोडू नये आणि मनामध्ये मुक्तीची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे, असे मनोगत 52 व्या इफ्फीच्या निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांनी व्यक्त केले. आपला चित्रपट आशेचा प्रकाश किरण दाखवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाविषयी काद्रंका पत्रकारांना म्हणाले, हा चित्रपट आपल्याला आलेल्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहे. ‘‘माझ्या वडिलांना पक्षाघात झाला आणि ते कोमात गेले. डॉक्टरांनाही ते वाचतील अशी आशा नव्हती. तरीही माझी आई आणि मी सगळी परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा मनाशी बाळगून प्रयत्न करीत होतो, ’’ असे यावेळी दिग्दर्शकांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, हा काही उपचार सुचवणारा चित्रपट नाही, तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे मला जो अनुभव आला, त्यावर आधारित चित्रपट आहे.
‘‘आम्ही कोमातल्या वडीलांशी बोलत होतो. विशेष म्हणजे आम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द त्यांनी ऐकला होता. त्यांना आमच्या भावना बरोबर समजत होत्या. आणि ते जसजसे बरे होऊ लागले, तसतसे त्यांनी आमच्याबरोबर या गोष्टी सामायिक केल्या. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता’’ असे दिग्दर्शकाने नमूद केले.
प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कसे स्वागत केले, याविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक लोकांनाही असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे चांगले अनुभव आले आहेत. त्यांनी तर आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपले अनुभव सांगितले. त्यांचे अनुभव ऐकणे म्हणजे खूप चांगली अनुभूती होती.
‘‘सेव्हिंग वन हू वॉज डेड’‘ (आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणी)
दिग्दर्शकाविषयी माहिती - वाक्लॅव काद्रंका हे झेक चित्रपट निर्माता आहेत. ‘एफएएमयू’ मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘एटी लेटर्स’ (2011) हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला. कम्युनिस्ट राजवटीतून स्थलांतर करताना, आपल्या आईने आपल्या वडिलांना जी पत्रे लिहिली, त्या पत्रांवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
या चित्रपटाची कार्लोवाय वॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2021 मध्ये निवड झाली आहे तसेच सेव्हिल युरोपियन चित्रपट महोत्सव 2021साठीही निवड करण्यात आली आहे.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775458)
Visitor Counter : 260