माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“काहीजण एखाद्या ठिकाणी राहू शकतात मात्र काही जणांना विस्थापित व्हावे लागते, असे का? ‘एनी डे नाऊ ’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा प्रश्न आम्हाला साऱ्या जगाला विचारायचा आहे.” : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी आलेल्या या चित्रपटाचा लेखक अँटी रौतावा म्हणतो
‘एनी डे नाऊ’ या चित्रपटाचे भारतातील प्रीमियर आज गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालं
पणजी, 26 नोव्हेंबर 2021
‘एनी डे नाऊ’ हा चित्रपट विस्थापितांना केवळ माध्यमे दाखवतात त्याप्रमाणे केवळ एका गटाचे प्रतिनिधीच नव्हे तर एक व्यक्ती, एक माणूस म्हणून दर्शवू पाहतो.
‘एखादया ठिकाणी हीजण राहू शकतात, मात्र काहींना विस्थापित व्हावे लागते…. असे का ?’ हा प्रश्न ‘एनी डे नाऊ’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी आलेल्या चित्रपटाचा लेखक साऱ्या जगाला विचारत आहे. लेखकाच्या मते, कोणत्याही माणसाची ओळख ‘विस्थापित’ अशी होऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न एनी डे नाऊ हा चित्रपट करत आहे. गोव्यात सुरु असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी या चित्रपटाची प्रवेशिका आली आहे.

दिग्दर्शकाच्याच जीवनावर स्थूलपणे बेतलेल्या या चित्रपटासाठी काम करण्याची संधी कशी मिळाली याबद्दल अँटी रौतावा बोलत होते. “दिग्दर्शक स्वतः फक्त ९ वर्षाचे असताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह इराण सोडून फिनलंड येथे पळून यावे लागले होते, त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी फार जवळचा आहे”, असे रौताव म्हणाले. “या चित्रपटातही कुटूंबाच्या मनातील असुरक्षितता, कोणत्याही क्षणी देश सोडून पळून जावे लागेल याची भीती, हे सर्व दाखवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मानवी जीवन सन्मानाने जगण्याची इच्छा, वर्तमानाचे महत्व ओळखून प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची मनोवृत्ती, याचेही दर्शन घडवले आहे.”

भारतातील महोत्सवात त्यांच्या चित्रपटाचे होणारे कौतुक त्यांच्यासाठी आनंददायी असल्याचे सांगताना ते म्हणाले, कि “ चित्रपटातील मेहदीपुर कुटुंबातील एकी, आणि सहनशीलता दाखवायचा आम्ही केलेला प्रयत्न सर्वांनाच भावतो आहे आणि आपलासा वाटतो आहे. अशा महोत्सवातून ही भावना जोपासली जाते ही फार चांगली गोष्ट आहे .”

‘एनी डे नाऊ’ - कथावस्तू
हामी रमेझान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १३ वर्षांचा रामीन मेहदीपुर आणि त्याच्या इराणी कुटुंबाची गोष्ट सांगतो. हे कुटुंब फिनलंड मधील एका विस्थापितांच्या शिबिरात राहत आहे. रामीन हळू हळू त्याच्या नव्या शाळेत रुळू लागतो , शाळेला सुटी पडते, आणि एक दिवस अचानक त्यांच्या कुटुंबाला बातमी कळते की या देशात आश्रय मिळावा म्हणून केलेला त्यांचा अर्ज फेटाळला गेला आहे . आता फिनलँडमधूनही आपण हाकलले जाऊ याची टांगती तलवार कुटुंबावर आहे. या परिस्थितीत रामीनच्या शाळेचे नवीन वर्ष सुरु होते. तो ठरवतो, कि “आता यापुढे शाळेत घालवलेला प्रत्येक क्षण, मिळालेला प्रत्येक मित्र हा जीवनातील अमूल्य ठेवा आहे आणि आपण त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा .”
* * *
Jaydevi PS/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775390)