राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एचबीटीयू सारख्या शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अभिनव संशोधन आणि उद्योजकतेची उर्जा रुजविली पाहिजे : राष्ट्रपती कोविंद


राष्ट्रपतींची कानपूर येथील हरकोर्ट बटलर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी समारंभात सन्माननीय उपस्थिती

Posted On: 25 NOV 2021 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

 

एचबीटीयूसारख्या शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अभिनव संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा रुजविली पाहिजे असे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. कानपूर येथील हरकोर्ट बटलर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी समारंभामध्ये उपस्थितांना संबोधित करताना ते आज बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले की, एचबीटीयू या संस्थेचे तेल, रंग, प्लास्टिक आणि अन्न तंत्रज्ञानातील योगदान उल्लेखनीय आहे. या शिक्षण संस्थेचा वैभवशाली इतिहास 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात होत असलेल्या औद्योगिक विकासाशी जोडलेला आहे. कानपूर शहराला ‘पूर्वेचे मँचेस्टर’, ‘जगातील चर्म शहर’ आणि ‘औद्योगिक केंद्र’ म्हणून ख्याती मिळवून देण्यामागे  एचबीटीयूने दिलेले तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, जेव्हा एचबीटीयू या संस्थेचे शकतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे तेव्हाच आपला देश स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आणि 2047 साली जेव्हा भारत शतक महोत्सव साजरा करत असेल तेव्हा एचबीटीयू 125 वे वर्ष साजरे करेल. राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी आराखड्यात एचबीटीयू सध्या 166 व्या स्थानी आहे याकडे निर्देश करत राष्ट्रपती म्हणाले की, या संस्थेला 2047 सालापर्यंत सर्वोत्तम 25 संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे लक्ष्य साध्य करण्यसाठी प्रत्येकाने निश्चयी वृत्तीने काम करायला हवे असे ते म्हणाले.

भारतातील अभिनव प्रकारचे संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या गरजेवर भर देऊन राष्ट्रपतींनी म्हणाले की, जगातील जे देश अभिनव संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्यांच्या नागरिकांना भविष्यातील आव्हानांशी तोंड देण्यास सतत सक्षम करतील तेच देश आघाडीवर राहतील. आपल्या देशाने देखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःबद्दलची विश्वासार्हता वाढविली असली तरी अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे.

तंत्रज्ञान शिकण्याच्या बाबतीत मुलींच्या कमी सहभागाकडे लक्ष वेधत राष्ट्रपती म्हणाले की, ते अनेक शैक्षणिक संस्थांच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी मुलींची प्रभावी कामगिरी पाहिली आहे. मात्र तंत्रज्ञानविषयक शिक्षणाच्या बाबतीत मुलींचा सहभाग फारसा समाधानकारक नाही. तंत्रज्ञानविषयक शिक्षणाच्या क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात मुलींनी रस घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे, महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल असे मत त्यांनी नोंदविले.

नवी दिल्ली येथे गेल्या शनिवारी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान राष्ट्रपतींच्या असे लक्षात आले की, देशातील शहरी संस्थांच्या स्वच्छ सर्वेक्षणात कानपूर शहराने 2016 मध्ये मिळविलेल्या 173 व्या स्थानावरून झेप घेत 2021 मध्ये 21 वे स्थान पटकाविले आहे याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला.

राष्ट्रपतींचे हिंदी भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775014) Visitor Counter : 212