माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

श्रद्धेच्या आडून फसवणूक आणि खोटेपणा अशा संकल्पनेवर आधारित स्पॅनिश थरारपट 'द प्रिचर' चा 52 व्या इफफीमध्ये जागतिक प्रीमियर शो

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

'द प्रिचर' हा एक स्पॅनिश रहस्यमय थरारपट असून भोळ्या, पापभिरू लोकांची श्रद्धेच्या नावाखाली नियोजनबद्ध फसवणूक करणाऱ्या टोळीच्या कारस्थानांची कथा यात आहे. जिथे श्रद्धेचा बाजार मांडत भ्रष्टाचार आणि फसवणूक बेमालूमपणे केली जाते अशा शहरातील कारस्थाने आणि धर्मांधता यांचे चित्रण असलेली ही कथा आहे. 

"या चित्रपटाच्या माध्यमातून,माझा हेतू अशा विषयाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा होता, जो जगात सगळीकडे घडतो आहे, अशी माहिती, 'द प्रिचर' चे दिग्दर्शक टिटो जारा यांनी दिली.  गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफफीदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला चित्रपटाचे निर्माते मगदा ग्रेस देखील उपलब्ध होते.

"मी स्वतः सश्रद्ध व्यक्ती आहे, त्यामुळे माझा चित्रपट कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. मात्र श्रद्धावान लोक जेव्हा अडचणीत असतात, त्यावेळी ही श्रद्धाच त्यांची शेवटची आशा असते, आपल्याला संकटातून बाहेर काढणारा काही चमत्कार होईल अशी आस त्यांना असते. अशा भोळ्या लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या काही दुष्टप्रवृत्ती असतात, त्यांच्यावर माझा सिनेमा कठोर प्रहार करतो." असे दिग्दर्शक म्हणाले.

धर्म हा असा विषय आहे, ज्यावर काहीही बोलले तर लगेचच भावना दुखावल्या जातात, आक्षेप घेतले जातात." मात्र आम्हाला काहीही विवाद निर्माण करण्यात रस नाही. धर्माच्या नावाखाली गैरफायदा घेणाऱ्या लोकांविरोधात माझा चित्रपट आहे." 

"धर्माबाबत लोक संवेदनशील असतात, याची मला जाणीव आहे. मात्र तरीही आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो, असा मला विश्वास वाटतो" असेही जारा पुढे म्हणाले.

हा चित्रपट वास्तव घटनांवर आधारित आहे. यात एका छोट्या मुलीची कथा आहे. या मुलीकडे कोणतेही आजार स्पर्शाने बरे करण्याची आणि त्रस्त मनांना दिलासा देण्याची 'दैवी शक्ती' आहे असा अपप्रचार करुन एक बदमाश तिचा वापर करुन घेतो.

"हा चित्रपट तयार करण्यासाठी मला 9 वर्षे लागलीत. याकाळात मी अशा अनेक 'कथित चमत्कार करणाऱ्या' आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना भेटलो. माझ्या देशात जे काही घडते आहे, त्याचाच लेखाजोखा मी या चित्रपटात मांडला आहे, असेही जारा यांनी सांगितले.

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774862) Visitor Counter : 227


Read this release in: English , Urdu , Hindi