माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 6

आपल्या परिघाबाहेरच्या जगाविषयी आपण खूपच असंवेदनशील बनलो आहोत, शहरांमध्ये वास्तव्य करणा-यांमध्ये एकाकीपणा हा एक गंभीर जागतिक आजार बनला आहे- 52व्या इफ्फीमध्ये ‘द नॉकर’चे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांचे मनोगत


शहरांमध्ये वर्षानुवर्षे एकटे वास्तव्य करणारे लोक भ्रमनिरास करून घेतात, काल्पनिक गोष्टींचा विचार करून स्वतःचे नुकसान करून घेतात काय? - ‘द नॉकर’ने विचारलेला प्रश्न

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

आपण सध्या आधुनिक डिजिटल युगामध्ये आणि अतिशय उत्तम संपर्क यंत्रणा असलेल्या जगात वावरत आहोत. कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आधुनिक माहितीच्या महाजाल यांची जगाला सवय झाली. एकटेपणाची तीव्रताही या काळात रूढ झालेल्या साधनांनी कमी केली. तरीही एक लक्षात आले ते म्हणजे, एकाकीपणा हा एक गंभीर जागतिक आजार, त्रास आहे. त्याकडे आपण लवकरच लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. हाच विषय ‘द नॉकर’ मध्ये घेतला आहे. माणसाच्या एकाकीपणातून, त्याच्या एकांतवासातून जन्माला येणारा त्याचा आंतरिक संघर्षावर हा लघुपट तयार करण्यात आला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधी गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय पॅनोरमा विभागात नॉन फीचर चित्रपट विभागामध्ये ‘‘द नॉकर’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. 

या सिनेमाविषयी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते अनंत नारायण महादेवन यांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शहरामधल्या वातावरणाविषयीचे हे कटूसत्य आहे. शहरामध्ये आपल्या विशिष्ट परिघाबाहेरच्या जगाविषयी, इतरांच्या जीवनाविषयी अतिशय असंवेदनशीलता दिसून येते. आपण स्वतःमध्येच अतिशय गुंग झालेलो असतो. स्वतःविषयी अतिशय सक्रिय असतो. अतिभावनाशील असतो. मात्र इतरांविषयी तितकेच असंवेदनशील असतो. आता जगभरामध्ये एकटेपणा हा एक गंभीर आजार बनला आहे. त्याचा खूप मनावर खोलवर परिणाम होतोय. ही गोष्ट हाताबाहेर जाण्याआधीच त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.’’ 

हा चित्रपट एका व्यक्तीविषयी आहे. ती व्यक्ती फक्त स्वतःसाठीच जगतेय. त्याच्या दरवाज्यावर ज्यावेळी थाप पडते, त्यावेळी त्याला एकदम आपण खूप एकाकी आहोत, हे जाणवते. 

‘‘या चित्रपटामध्ये काही प्रश्न निर्माण केले आहेत. दारावर थाप देणारा तुमच्या मनाच्या बाहेर आहे की, तो आवाज मनातला आहे? हे अमूर्त असते. कारण नायक वास्तव आणि कल्पना यांच्यामध्ये गोंधळून जातो. मनाचे एक मनोवैज्ञानिक नाटक त्यातून उलगडत जाते आणि हा सगळा गुंता कसा सोडवायचा, हे नायकाला शोधावे लागते.’’ 

यावेळी बोलताना महादेवन यांनी स्पष्ट केले की, या चित्रपटात शहरांमध्ये वर्षानुवर्षे कामासाठी किंवा इतर कारणांसाठी एकट्याने वास्तव्य करणा-या पुरूषांच्या मानसिक संघर्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात प्रश्न असा आहे की, महानगरांमध्ये, अगदी जणू कबुतरांच्या खुराड्यात राहणारे लोकसुद्धा सर्जनशील असतात, हे संवेदनशीलही असतात. मात्र भ्रमनिरास करून घेवून आणि काल्पनिक गोष्टींमुळे ते स्वतःचे नुकसान करून घेत आहेत का? त्यांच्या जीवनावर, मानसिकतेवर नेमका काय परिणाम होतो? याविषयीचे कथानक ‘द नॉकर’ या चित्रपटाचे आहे. 

महादेवन पुढे म्हणाले की, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आमची टीम विशेष डिजिटल मंचाचा शोध घेत आहे. आशा आहे की, लवकरच एका मोठ्या डिजिटल मंचाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना पहायला मिळेल. 

आपला ‘बिटर स्वीट’ आणि ‘द नॉकर’ असे दोन चित्रपट  यंदाच्या इफ्फीमध्ये प्रदर्शित होत आहेत. एकाच दिग्दर्शकाच्या दोन कलाकृतींची निवड होणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. इफ्फीने आत्तापर्यंत पाच वेळा चित्रपट प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल महादेवन यांनी इफ्फीचे आभार मानले. 


* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774780) Visitor Counter : 258


Read this release in: Hindi , English , Urdu