ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

कोरोना महामारीच्या काळात अनेक आव्हानांना तोंड देत भारतीय अन्न महामंडळाने मोफत अन्नधान्य वितरणासाठी धान्यसाठा हाताळण्याची महत्त्वाची जबाबदारी पेलली - एफसीआयचे पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर. पी. सिंह


कोरोना काळात एफसीआयने केलेली कामगिरी असामान्य असून त्याची माहिती लोकांसमोर आली पाहिजे- खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रशंसा

Posted On: 24 NOV 2021 3:31PM by PIB Mumbai

मुंबई, 24 नोव्हेंबर 2021

कोविड काळात मोफत अन्नधान्य वितरणाच्या योजनेत भारतीय अन्न महामंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली असून, अनेक आव्हानांना तोंड देत एफसीआयच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी धान्यसाठ्याच्या हाताळणीचे आव्हान पेलले, अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर पी सिंह यांनी आज मुंबईत दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय खाद्य महामंडळाच्या पश्चिम विभागाच्या वतीने आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागाच्या कामाचा आढावा घेताना आर पी सिंह यांनी या विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली. कोविड काळात गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आणि या वर्षी देखील मे पासून नोव्हेंबर महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. या 15 महिन्याच्या काळात पश्चिम विभागात 1 कोटी 30 लाख टन धान्य देण्यात आले आणि त्याचे मोफत वितरण करण्यात आले. मात्र, हे काम करताना आलेल्या अडचणींचा एफसीआयने यशस्वीपणे सामना केला असे ते म्हणाले.  लॉकडाऊनमुळे महामंडळाकडे पुरेसे कर्मचारी नव्हते, कामगार काम सोडून निघून गेले होते, मालाची ने आण करता येत नव्हती आणि दर महिन्याला येणारे धान्य साडेदहा लाख टनाच्या घरात असताना, या काळात ते 19 लाख टन म्हणजे जवळजवळ दुप्पट झाले होते. या अडचणींना तोंड देत एफसीआयच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय धीराने आणि चिवटपणाने या परिस्थितीचा सामना केला आणि कोणतीही तक्रार न करता किंवा येऊ न देता, अहोरात्र काम करत, धान्य वितरणाची मोठी जबाबदारी पूर्ण करून दाखवली, अशी माहिती त्यांनी दिली. या काळात काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी देखील गेला. या कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सिंह यांनी गेल्या वर्षभरातल्या कामगिरीबरोबरच धान्याच्या खरेदीमध्ये गेल्या सात वर्षात झालेल्या बदलांची माहिती दिली.

FCI च्या पश्चिम विभागातील चार राज्यांपैकी मध्य प्रदेशातून गव्हाची आणि छत्तीसगडमधून धानाची खरेदी होत होती. मात्र, महाराष्ट्रात काही प्रमाणात तर गुजरातमध्ये अगदीच नगण्य होती. या विभागात चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 2014-15 मध्ये 71 लाख टन धान्याची खरेदी होत होती, 2020-21 मध्ये ते प्रमाण 119 लाख टनांवर पोहोचले, असे त्यांनी सांगितले. गव्हाच्या खरेदीमध्ये गेली अनेक वर्षे पंजाबचे वर्चस्व राहिले होते मात्र गेल्या वर्षी मध्य प्रदेशने विक्रमी खरेदी करून पंजाबला मागे टाकले, अशी माहिती सिंह यांनी दिली.

यावेळी उत्तर मुंबई लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी, महाप्रबंधक सामान्य बी.एस. भाटी, महाप्रबंधक शाइनी विल्सन, महाप्रबंधक लेखा बी.बी. गुप्ता, नगरसेविका आसावरी पाटील यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एफसीआयच्या कामाची माहिती घेतल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी या कामाची प्रशंसा केली. कोरोना काळात एफसीआयने केलेल्या असामान्य कामगिरीमुळेच लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचू शकलं, असे ते म्हणाले. त्यांनी इतकं काम केलं मात्र, त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही. त्यांनी केलेलं हे काम खूप मोठी गोष्ट आहे, असं ते म्हणाले. काही लोक खूप जास्त काम करतात पण ते कधीही त्याचा गाजावाजा करत नाहीत, एफसीआयने देखील इतकी मोठी कामगिरी केली आहे, मात्र आज ती लोकांसमोर येत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एफसीआयला काही सूचनाही केल्या. धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकचालकांना बाहेर थांबवून ठेवण्यापेक्षा एफसीआयच्या संकुलाच्या आतच त्यांची व्यवस्था करावी, त्यांना कँटिन आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि एफसीआयकडे उपलब्ध असलेल्या जागेचा सुयोग्य वापर करण्याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी फूड प्लाझाचा विचार मांडला होता, त्या दृष्टीकोनातून या जागेमध्ये अशा प्रकारच्या प्रकल्पांची आणि सुविधांची व्यवहार्यता तपासून पाहावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांकडून सातत्याने होत असलेल्या नावीन्यपूर्ण विचारांचे दाखले दिले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामुळे खऱ्या अर्थाने लोकांना आपल्या दैनंदिन जीवनातही देशासाठी काही तरी करता येऊ शकतं याची जाणीव होऊ लागली आहे, असं ते म्हणाले.

यावेळी भारतीय अन्न महामंडळ तामिळनाडू तंजावर इथं उभारण्यात आलेल्या अन्न सुरक्षा संग्रहालयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली. त्यामध्ये पारंपरिक आणि अत्याधुनिक अन्न साठवणूक पद्धतीच्या मदतीने अन्नधान्य जास्तीत जास्त काळासाठी कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येते याची माहिती देण्यात आली.

 

JPS/ST/SP/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774576) Visitor Counter : 255


Read this release in: English , Hindi , Tamil