निती आयोग
नीती आयोगाने आर्थिक सहकार आणि विकास मंत्रालयासह (बीएमझेड) इरादापत्रावर केली स्वाक्षरी, "विकास सहकार्यावर नीती-बीएमझेड संवादाला" सुरुवात
Posted On:
23 NOV 2021 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
नीती आयोग आणि आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय (बीएमझेड) यांनी 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारत आणि जर्मनी यांच्यातील परस्पर हिताच्या विविध क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासाठी एका इरादापत्रावर (एसओएल) स्वाक्षरी केली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व नीती आयोगाचे, उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यांनी केले. तर जर्मन शिष्टमंडळाचे नेतृत्व बीएमझेडचे महासंचालक प्राध्यापक डॉ क्लॉडिया वॉर्निंग यांनी केले.
नियमित द्विपक्षीय चर्चा, विकासात्मक धोरण, अनुभवांची देवाणघेवाण आणि सुरु असलेल्या द्विपक्षीय कार्यक्रमांचे सिंहावलोकन करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करण्याकरता "विकास सहकार्यावर नीती-बीएमझेड संवाद" ही एक व्यापक यंत्रणा स्थापन करण्याचा या इरादापत्राचा उद्देश आहे.
या इरादापत्राअंतर्गत, नीती आयोग आणि बीएमझेड, बहु-क्षेत्रीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दृष्टिकोन आणि धोरणे तयार करण्यात मदत करण्याकरता संयुक्त संशोधन करतील. दोन्ही बाजूंनी सरकारी संस्था, अग्रगण्य विचारमंच (थिंक टँक), उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेतले जाईल, दोन्ही बाजूंनी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण केले जाईल आणि चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माहिती प्रदान केली जाईल.
नीती आयोग आणि बीएमझेड यांना हवामान आणि शाश्वत विकास उद्दिष्टे, ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृषीशास्त्र या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्व पटले आहे. अलीकडे, दोन्ही बाजू या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. दोन्ही बाजूंनी इरादापत्रावर स्वाक्षरी केल्याने द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत होईल.
"विकास सहकार्यावर नीती-बीएमझेड संवाद" हा द्वि-वार्षिक अर्थात दोन वर्षातून एकदा होणारा संवाद आहे. यात नीती आयोग आणि बीएमझेड यांच्याद्वारे प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जाईल तसेच महत्वाच्या माहितीचे, विचारांचे आदानप्रदान केले जाईल. या संवादाचे नेतृत्व नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि दक्षिण आशिया सहकार्यासाठी जबाबदार असलेले बीएमझेडचे महासंचालक, करतील. पहिला संवाद 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची अपेक्षा आहे.
G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774322)
Visitor Counter : 150