माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएफटी -युनेस्को गांधी पदकासाठी चित्रपटांची यादी जाहीर

Posted On: 16 NOV 2021 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021

52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आयसीएफटी -युनेस्को गांधी पदकासाठी स्पर्धेत असलेल्या  नऊ चित्रपटांची  यादी जाहीर केली आहे . यासाठी निवडलेले चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत-

1. 21st टिफिन

दिग्दर्शक: विजयगिरी बावा | भारत | 2020 | गुजराती |  88 मि. | रंगीत

21st टिफिन ही पत्नी, आई, मुलगी, बहीण आणि मित्र अशी भूमिका पार पाडणाऱ्या  एका मध्यमवयीन महिलेची कथा आहे. ती स्वतः  टिफिन सेवा चालवते. वयात आलेली  मुलगी नितूच्या लक्षात येते की तिची आई तिची सर्व कर्तव्ये चोखपणे बजावत आहे , मात्र ती दुःखी आहे हे  तिच्या वागण्यातून दिसून येत आहे.  ध्रुव हा तरुण मुलगा जो तिच्या टिफिन सेवेचा 21वा ग्राहक बनून  येतो , तो त्या महिलेचे कौतुक करतो. अचानकपणे झालेले कौतुक आणि सर्वांनी घेतलेली दखल  यामुळे आईचे दुःख दूर होते. भावनिक आणि संवेदनशील परिस्थितीतून  मांडण्यात आलेले आईबद्दलचे  नितूचे निरीक्षण एक मनोरंजक नाट्य आहे.

2. कमिटमेंट हसन

दिग्दर्शक  : सेमीह कप्लानोग्लू  | तुर्की  | 2021 | तुर्की  | 147 मि . | रंगीत

वडिलोपार्जित जमिनीत बागकाम आणि शेती करून आपला उदरनिर्वाह चालवणारा हसन त्याच्या जमिनीच्या मध्यभागी बसवण्यात येणारा विजेचा खांब हटवण्याचा प्रयत्न करतो. तीर्थयात्रेसाठीचा त्याचा मक्केचा प्रवास त्याला भूतकाळात  आत्म्याच्या शोधाकडे घेऊन जातो.

3. किलिंग द युनूक खान

दिग्दर्शक : अबेस्ट आबेद  | इराण | 2021 | फारसी , अरेबिक  | 110 मि . | रंगीत

शहरातील खड्ड्यांवर रक्त सांडावे इतका सिरीयल किलरचा हत्याकांडामागचा भीषण कट आहे. या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी, तो एक योजना आखतो,  ज्यामध्ये पीडित पीडितांना मारतात. योजना राबवली जाते आणि एकमेकांना मारणाऱ्या लोकांमुळे रक्ताच्या थारोळ्याने  हळूहळू शहराचे खड्डे भरून जातात.

4. कुलंगळ

दिग्दर्शक: विनोदराज पी एस | भारत | 2020 | तमिळ | 77  मि. | रंगीत

तामिळनाडूच्या दक्षिणेकडील 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन रखरखीत वस्त्या सूर्याच्या साक्षीने एक नाट्य उलगडतात.  एका असह्य उकाड्याच्या दिवशी, पत्नीला मारहाण करणारा दारुड्या गणपती,त्याच्या लहान मुलाला  वेलूला शाळेतून जबरदस्तीने बाहेर काढतो आणि त्याच्या पळवून लावलेल्या  पत्नीला परत आणण्यासाठी प्रवासाला निघतो . सासरच्या घरी पोहोचल्यावर त्याला कळते की त्याची बायको आधीच त्याच्या घरी परत जाण्यासाठी निघून गेली आहे. निराश होऊन तो त्याच्या सासरच्या लोकांशी भांडतो  आणि आपल्या मुलाचा राग ओढवून घेतो. लहान  मुलगा बसच्या तिकिटाचे  तुकडे करून आपले नैराश्य व्यक्त करतो. यामुळे या दोघांना घरी  पोहोचण्यासाठी भर उन्हात गावातील रस्त्यावरून  पायी चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यांच्या भावना जमिनीशी गुंफलेल्या आहेत, जिथे धगधगती  उष्णता वडिलांचा संताप अनावर करते.  हा प्रवास सामान्य लोकांच्या घामाने आणि धुळीने , रेंगाळणाऱ्या अडचणी  आणि निर्जन प्रदेश यांनी भरलेला आहे.  शेवटी , महिलांचा सोशिक स्वभाव पुरुषांची भूक आणि राग शांत करतो. प्रेम आणि द्वेषाचे हे दुष्टचक्र असेच सुरु राहणार  आहे.

5. लिंगुई, द सॅक्रेड बॉण्ड्स

दिग्दर्शक: महमत सालेह हारून | चाड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी | 2021 | फ्रेंच, अरबी | 87 मि. | रंगीत

चाडमधील एन'जामेनाच्या दुर्गम भागात, अमिना आपल्या 15 वर्षांची मुलगी मारियासोबत एकटी राहत असते.  ज्या दिवशी तिला कळते  की तिची मुलगी गरोदर आहे त्या दिवशी तिचे आधीच कमकुवत असलेले जग विस्कळीत होते. लहान मुलीला  ही गर्भधारणा नको आहे. ज्या देशात गर्भपाताचा केवळ धर्मच नव्हे तर कायद्यानेही निषेध केला जातो, अशा देशात अमीना स्वतः अशा लढाईला सामोरे जात असल्याचे दिसते जी ती आधीच हरलेली आहे .

6. नाईट फॉरेस्ट

दिग्दर्शक: आंद्रे हॉर्मन आणि कॅटरिन मिल्हान | जर्मनी | 2021 | जर्मन | 96 मि. | रंगीत

पॉल आणि  मॅक्स हे चांगले मित्र आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पहिल्या दिवशी, ते घरातून बाहेर पडतात आणि डोंगरावरील जंगलात उंचावरील प्रसिद्ध गुहा शोधत असतात. जंगलात  एकटेच असलेल्या  दोघांना अनपेक्षित  स्वातंत्र्याचा अनुभव येतो आणि त्यांना मोठे धोके आणि दुर्गम अडथळ्यांचा सामना करावा लागतो. एका मोठ्या  उन्हाळी साहसाला सुरुवात होते.

7. निरये ठाठकलुल्ला मारम

दिग्दर्शक: जयराज | भारत | 2021 | मल्याळम | 90 मि.

आठ वर्षांचा मुलगा पूजन हा काही सामान्य मुलगा नाही. दारुडे  वडील, आजोबा आणि पणजोबा  असलेल्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो घरामागच्या तळ्यात मासेमारी सारखी लहानसहान कामे करतो. काही वर्षांपूर्वी त्याची आई दुसऱ्या पुरुषासोबत  पळून गेली आहे .

एके दिवशी पूंजुआन बोटीच्या जेटीवर घराचा रस्ता चुकलेला  एक आंधळा माणूस एकटा बसलेला पाहतो. त्याचा स्मृतिभ्रंश झाला आहे, आणि त्याला फक्त त्याच्या घरासमोर पोपटांनी भरलेले एक विशिष्ट झाड आठवते. या व्यक्तीची पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतो.

शेवटी, पूंजन पोपटांनी भरलेले झाड शोधण्याचा प्रयत्न करून आंधळ्या व्यक्तीच्या घराचा रस्ता शोधण्याचा  निर्णय घेतो. वाटेत  पूंजन ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींना मार्ग विचारतो. त्यांचा न संपणारा प्रवास  पाहून निराश होऊन तो शोध सोडून देण्याच्या विचारात असतो.  तेवढ्यात, त्यांना पोपटांचा आवाज ऐकू येतो जो त्यांना पोपटांनी भरलेल्या झाडाकडे घेऊन जातो.

8. टोकियो शेकिंग

दिग्दर्शक: ऑलिव्हियर पेयॉन | फ्रान्स | 2021 | फ्रेंच, इंग्रजी, जपानी | 101 मि. | रंगीत

मार्च 11, 2011. टोकियोने आतापर्यंतचा अनुभवलेला सर्वात मोठा भूकंप फुकुशिमा आपत्तीला कारणीभूत ठरतो.  अलेक्झांड्रा नुकतीच बँकेत नोकरी करण्यासाठी फ्रान्सहून जपानमध्ये  आली आहे आणि तिला या आण्विक संकटाचा सामना करावा लागला आहे. आपली नोकरी  आणि तिचे कुटुंब यांच्यात अडकलेली , ती वाढती दहशत आणि चिंता असूनही सन्मान आणि दिलेल्या वचनाचे  रक्षण करेल .

9. व्हेन पोमोग्रॅनेट्स हाऊल

दिग्दर्शक: ग्रानाझ मौसावी | ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान | 2021 | फारसी, पश्तो | 80 मि. | रंगीत

काबूलच्या रस्त्यावर, एक मुलगा मोठे बनण्याचे स्वप्न पाहतो आणि प्रसिद्धीच्या शोधात असलेल्या त्याला एका परदेशी व्यक्तीला भेटण्याची संधी मिळते .

 

 Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772423) Visitor Counter : 246


Read this release in: Hindi , English , Tamil