आदिवासी विकास मंत्रालय
भारताने साजरा केला आदिवासी गौरव दिन
Posted On:
16 NOV 2021 2:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल आदिवासी गौरव दिन देशभरात साजरा करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कार्यक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच झारखंड मधील खुंटी येथील उलिहाटू इथल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित 15 नोव्हेंबर हा दिवस सरकारने आदिवासी गौरव दिन म्हणून जाहीर केला आहे, जेणेकरून भावी पिढ्यांना देशासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाची माहिती मिळेल. या तारखेला बिरसा मुंडा यांची जयंती आहे ज्यांना देशभरातील आदिवासी समुदाय भगवान म्हणून पूजतात.
पंतप्रधानांनी सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 रोजी रांची येथे "भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे" उद्घाटन केले. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी देशभरात 15 ते 22 नोव्हेंबर 2021 या आठवड्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ देखील केला.
पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि विविध राज्यांतील आदिवासी प्रतिनिधींची भेट घेतली.
'आदिवासी गौरव दिना' च्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशातील जनतेला एकत्र येण्याचे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्र उभारणीतील आदिवासी समुदायांच्या योगदानाला वंदन करण्याचे आवाहन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे अमूल्य बलिदान त्यांनी सातत्याने अधोरेखित केले. त्यांच्या मागील भाषणांमध्ये, त्यांनी शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित संग्रहालये बांधण्याची कल्पना मंडळी होती जेणेकरून भावी पिढ्या देशासाठी त्यांच्या बलिदानाची दखल घेतील आणि या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा पुढे नेतील.
या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आतापर्यंत 10 आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. ही संग्रहालये भारतातील विविध राज्यांतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपतील.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772282)
Visitor Counter : 405